शासकीय हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:40 AM2021-02-17T04:40:42+5:302021-02-17T04:40:42+5:30
बुलडाणा : जिल्ह्यात चालू हंगाम २०२०-२१ मध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने हरभरा खरेदी हमीदर ५१०० रुपये ...
बुलडाणा : जिल्ह्यात चालू हंगाम २०२०-२१ मध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने हरभरा खरेदी हमीदर ५१०० रुपये प्रती क्विंटलप्रमाणे खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी १५ फेब्रुवारीपासून शासकीय हरभरा खरेदी सुरू करण्यात आली आहे.
हरभरा खरेदीसाठी जिल्ह्यात दहा खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यांतर्गत बुलडाणा तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादित, देऊळगावराजा तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादित, लोणार तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादित, मेहकर तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादित, शेगाव तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादित, संग्रामपूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादित, संत गजानन कृषी विकास शेतकी उत्पादन कंपनी मोताळा, सोनपाऊल ॲग्रो प्रोडयुसर कंपनी सुलतानपुर केंद्र साखरखेर्डा, ता. सिं.राजा, मा जिजाऊ फार्मर प्रोडयुसर कंपनी सिंदखेडराजा, स्वराज्य शेतीपूरक सहकारी संस्था चिखली केंद्र उंद्री, ता. चिखली, अशी दहा खरेदी केंद्रांना हरभरा खरेदीकरिता मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यात १५ फेब्रुवारीपासून नोंदणी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हरभरा खरेदी नोंदणी करण्याकरिता शेतकऱ्यांनी आधारकार्ड, ७/१२ ऑनलाईन पीक पेरासह बँक पासबुकाची आधार लिंक केलेली झेरॉक्स, मोबाईल क्रमांक, आदी कागदपत्रांसह संबंधित खरेदी केंद्रावर जाऊन खरेदी करिता नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.