'आरटीई'साठी शाळांच्या नोंदणीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 12:02 PM2021-02-01T12:02:51+5:302021-02-01T12:03:23+5:30
Right To Education News दरवर्षी लांबणारी प्रवेश प्रक्रिया यंदा लवकरच होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : सन २०२०-२१ चे सत्र संपण्यापूर्वीच नवे शैक्षणिक सत्र २०२१-२२ च्या आरटीई प्रवेशाचे सांभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यामुळे दरवर्षी लांबणारी प्रवेश प्रक्रिया यंदा लवकरच होण्याची शक्यता आहे. नव्या शाळांना नोंदणीसाठी व आरटीई प्रवेशपात्र ॲटो फॉरवर्ड करण्यासाठी ८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
आर्थिक व दुर्बल घटकांतील बालकांना उच्च शिक्षण देण्याच्या उद्देशाने शासनाने २००९ मध्ये शिक्षण हक्क कायदा लागू केला. या कायद्यानुसार नामांकित शाळेमध्ये २५ टक्के बालकांना मोफत शिक्षण देण्याची तरतूद आहे. दरवर्षी ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येते. मात्र, विविध कारणांस्तव ही प्रक्रिया दरवर्षीच लांबत होती. या वर्षी वेळेत प्रवेश प्रक्रिया होण्यासाठी सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठीची आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यासाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यामुळे या वर्षी तरी वेळेत प्रवेश होतील, अशी आशा पालकांना आहे.
असे आहे वेळापत्रक
८ फेब्रुवारीपर्यंत आरटीई प्रवेशपात्र सन २०२०-२१ च्या ॲटो फॉरवर्ड केलेल्या शाळांचे आणि नवीन शाळांची नोंदणी केलेल्या शाळांचे व्हेरिफिकेशन करणे.
९ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी ऑनलाइन अर्ज करणे, ५ ते ६ मार्च सोडत, ९ ते २६ मार्च निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी, २७ मार्च ते ६ एप्रिल पहिली प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.