रेखाताई अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाच्या धनी : राजेंद्र शिंगणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:32 AM2021-04-14T04:32:09+5:302021-04-14T04:32:09+5:30
चिखली : राजकारणात कमीत कमी शत्रू आणि जास्तीत जास्त मित्र असलेल्या व्यक्ती फार तुरळक असतात. यामध्ये रेखाताई खेडेकर यांचे ...
चिखली : राजकारणात कमीत कमी शत्रू आणि जास्तीत जास्त मित्र असलेल्या व्यक्ती फार तुरळक असतात. यामध्ये रेखाताई खेडेकर यांचे नाव कायम अग्रक्रमावर आहे. त्यांच्या आजवरच्या जीवनप्रवासावर टाकलेला दृष्टिक्षेप आणि आमदार म्हणून सोबत केलेले काम पाहता राजकारणात त्यांच्यासारखे अजाजशत्रू व्यक्तिमत्त्व फार कमी पहावयास मिळतात, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी चिखली येथे केले.
चिखली मतदार संघाच्या माजी आमदार रेखाताई खेडेकर यांच्या एकसष्टी व ‘जनरेखा’ या गौरवग्रंथाचा प्रकाशन सोहळा १२ एप्रिल रोजी कौटुंबिक स्वरूपात पार पडला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रतापराव जाधव होते. यावेळी रेखाताई खेडेकर यांच्या सर्वव्यापी कारकिर्दीवर आधारित ‘जनरेखा’ या चारशे पानांच्या गौरवग्रंथाचे प्रकाशन ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, सत्कारमूर्ती रेखाताई खेडेकर, रजनीताई शिंगणे, नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर मराठा सेवा संघाव्दारे हा सोहळा ऑनलाईन पद्धतीने प्रसारित करण्यात आला. सोहळ्यापूर्वी रेखाताई खेडेकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित चित्रफीत ऑनलाईन प्रसारित केल्या गेली. यावेळी नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे, पुरुषोत्तम खेडेकर यांनीदेखील मार्गदर्शन केले. तत्पूर्वी रत्नप्रभा खेडेकर, उषाताई खेडेकर, जिजाबाई देशमुख, प्रीती खेडेकर, वीणा देशमुख यांनी रेखाताईंचे औक्षण केले. या कौटुंबिक सोहळ्याचे सूत्रसंचालन स्नेहल पाटील यांनी केले. तर आभार सौरभ खेडेकर यांनी मानले. यशस्वितेसाठी रेखाताई खेडेकर एकसष्टी सत्कार व गौरव ग्रंथ प्रकाशन समितीचे पांडुरंग खेडेकर, पंडितराव देशमुख, कपिल खेडेकर, प्राचार्य बाळासाहेब ठाकरे आदींनी परिश्रम घेतले.
रेखाताईंनी बहुजन समाजातील स्त्रियांना धाडस दिले : खा. प्रतापराव जाधव
बहुजन समाजातील स्त्रिया ‘चूल आणि मूल’ या चौकटीतून बाहेर पडल्या तरी राजकारणात फारसा रस दाखवित नाहीत. अशा महिलांना धाडस देण्याच काम रेखाताईंनी केले आहे. प्रखर हिंदुत्ववादी पक्ष आणि मराठा सेवा संघ या परस्पर विरोधी दोन टोकाच्या संघटना असतानादेखील त्यांनी स्वत:ची प्रतिभा सिद्ध केली आहे. यामध्ये पुरुषोत्तम खेडेकर यांनी दिलेली साथ अद्वितीय आहे, असे प्रतिपादन खासदार प्रतापराव जाधव यांनी केले.