कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या बँकनिहाय याद्या प्रसिद्ध करा!
By admin | Published: July 6, 2017 12:08 AM2017-07-06T00:08:24+5:302017-07-06T00:08:24+5:30
हर्षवर्धन सपकाळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यातील २ लाख ४९ हजार ८१८ शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आल्याची मुख्यमंत्र्यांनी ट्विटरद्वारे केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या बँकनिहाय याद्या व कर्जमाफीची रक्कम प्रसिद्ध करण्याबाबतची मागणी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
कर्जमाफीच्या या गोंधळात ३० जून २०१७ पर्यंत केवळ २८ हजार ८९९ शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामासाठी पीक कर्ज मंजूर करण्यात आले असून, अनेक शेतकरी अद्यापही वंचित आहेत. या शेतकऱ्यांना १५ जुलैपर्यंत युद्ध पातळीवर पीक कर्ज देण्याबाबतची मागणीसुद्धा आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
सोमवारी मध्यरात्री मुख्यमंत्र्यांनी ट्विटरद्वारे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी प्रदान करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची संख्या घोषित केली आहे. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील २ लाख ४९ हजार ८१८ शेतकऱ्यांचा समावेश आहे. विशेष उल्लेखनीय असे, की या संख्येमध्ये पुनर्गठन, नियमित कर्ज भरणारे तसेच ओ.टी.एस. चा लाभ घेणारे शेतकरी समाविष्ट नसल्याचे सुद्धा मुख्यमंत्र्यांकडून नमूद करण्यात आलेले आहे.
या पार्श्वभूमीवर आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलडाणा जिल्ह्याची सन २०१६-१७ या वित्तीय वर्षातील पीक कर्ज वाटपाची स्थिती आपल्या निवेदनात नमूद केली असून, खरीप हंगाम नियोजनाच्या अहवालानुसार १,६६,०६७ शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले होते. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक (४६,१४२), राष्ट्रीयीकृत बँका (१,१८,९०५) व ग्रामीण बँक (३१,०२०) इत्यादींचा समावेश आहे. तर १,३३,५०५ शेतकरी हे थकबाकीदार होते. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक (४१,३६२), राष्ट्रीयीकृत बँका (६७, ९१८) व ग्रामीण बँक (२३,२२५) इत्यादींचा समावेश आहे. म्हणजेच बुलडाणा जिल्ह्यात सन २०१६-१७ मध्ये एकूण २,९९,५७२ शेतकरी हे बँकेशी संबंधित खातेदार असल्याचे नमूद केले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी ट्विटद्वारे घोषित केलेल्या कर्जमाफीदार शेतकऱ्यांच्या २,४९,८१८ या संख्येमुळे संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. कर्जमाफी संदर्भात शासनाच्या आतापर्यंतच्या वेळखाऊ भूमिकेमुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलेला असून, कर्जमाफी मिळाली की नाही, नवीन पीक कर्ज मिळणार की नाही, या कोंडीत अडकलेला असल्याचे आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी निदर्शनास आणून दिले आहे. तसेच सन २०१६-१७ या वित्तीय वर्षात ३० जून २०१७ पर्यंत केवळ २८,८९९ शेतकऱ्यांनाच पीक कर्ज मंजूर करण्यात आल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
प्रशासकीय पातळीवर शेतकरी कर्ज वाटप व कर्जमाफीच्या अनुषंगाने विविध विभागांच्या व बँकांच्या आकडेवारीमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ निदर्शनास येत असून, यंत्रणेत सुद्धा गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र आहे. ही बाब लक्षात घेता बुलडाणा जिल्ह्यातील कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या बँकनिहाय याद्या व कर्जमाफीची रक्कम प्रत्येक बँकेने प्रसिद्ध करण्याबाबत संबंधित यंत्रणेला निर्देश द्यावे, सोबतच चालू हंगामात केवळ सहा टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले असून, शेतकऱ्यांची आर्थिक विवंचना लक्षात घेता, १५ जुलैपर्यंत पीक कर्ज वितरित करण्याची मागणी आ. सपकाळ यांनी केली आहे.