खडकपूर्णा नदीपात्रात पाणी सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:40 AM2021-02-20T05:40:21+5:302021-02-20T05:40:21+5:30
प्रामुख्याने सिंदखेड राजा, देऊळगाव राजा आणि लोणार तालुक्यातील ४४ गावांना पाणीटंचाईचा उन्हाळ्यात सामना करावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर या तिन्ही ...
प्रामुख्याने सिंदखेड राजा, देऊळगाव राजा आणि लोणार तालुक्यातील ४४ गावांना पाणीटंचाईचा उन्हाळ्यात सामना करावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर या तिन्ही तालुक्यांत तीन कोल्हापुरी बंधारे आहेत. त्यामध्ये हे पाणी साठवले जाते. सोबतच या पाण्याचा शेतीसाठीही वापर करण्यात येतो. त्यानुषंगाने खडकपूर्णा प्रकल्पांतर्गत यासाठी पाच दलघमी पाणीही आरक्षित करण्यात आलेले आहे. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी हे पाणी सोडण्यात आले. पहिल्या टप्प्यात २.५ दलघमी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दुसरीकडे यासंदर्भाने सिंदखेड राजा प. सं. चे सभापती विलासराव देशमुख यांनी संवर्ग विकास अधिकाऱ्यांशीही चर्चा केली होती. त्यानंतर पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडेही पाठपुरावा केला होता. त्यानुषंगाने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक होऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
खडकपूर्णाच्या दोन दरवाजांतून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. येत्या ४५ तासांत हे पाणी देवखेड येथील कोल्हापुरी बंधाऱ्यात पोहोचेल. त्यामुळे या भागातील नदीकाठच्या गावांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतसिंचनाचाही प्रश्न मिटणार आहे.