दूध उत्पादकांना दिलासा
By Admin | Published: June 20, 2017 04:38 AM2017-06-20T04:38:53+5:302017-06-20T04:38:53+5:30
दुधाच्या दरात तीन रुपयांनी वाढ; बुलडाणा जिल्हय़ात २१ हजार लीटर दुधाचे संकलन.
विवेक चांदूरकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शासनाने गाय व म्हशीच्या दुधाच्या भावात तीन रुपयांनी वाढ केली असल्यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकर्यांना अच्छे दिन आले आहेत. जिल्ह्यात २१२00 लीटर दुधाचे दररोज संकलन होत असून, तीन रुपये वाढ झाल्याने शेतकर्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.
जिल्ह्यात दुधाचे उत्पादन घेणार्या पशुपालकांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. हजारो शेतकर्यांना दुधाच्या उत्पादनातून लाखो रूपयांचे उत्पन्न मिळते. जिल्ह्यातील दूध अन्य जिल्ह्यातही विक्रीस जाते. शासनाच्यावतीने दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. गायीच्या दुधाचे दर २४ वरून २७ रुपये, तर म्हशीच्या दुधाचे दर ३३ वरून ३६ रुपये करण्यात आले आहेत. जिल्ह्यात नांदुरा, चिखली या तालुक्यांमध्ये जास्त दुधाचे उत्पादन घेतले जाते. तसेच लोणार, मेहकर, जळगाव जामोद येथेही दुधाचे उत्पादन बर्यापैकी घेतले जाते. जिल्ह्यात धाड येथील अमर दूध डेअरी, गोडे दूध डेअरीच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात दुधाची खरेदी करण्यात येते. अमर डेअरी दररोज १५
हजार, तर गोडे दूध डेअरी तीन हजार लीटर, शासकीय दूध संघ १२00
लीटर प्रतिदिवस दुधाची खरेदी करते. देऊळगाव राजा तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी राहेरीच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यात वरोडीला दररोज दोन हजार लीटर दूध पाठवितात. शासकीय दरापेक्षाही खासगी डेअरीमध्ये शेतकर्यांना जास्त दर देण्यात येतो. त्यामुळे दुध उत्पादक शेतकर्यांना आता चांगले दर मिळणार आहेत.
दूध उत्पादक संघ डबघाईस
जिल्ह्यातील दूध उत्पादक संघ डबघाईस आला आहे. खासगी डेअरीमध्ये हजारो लीटर दुधाचे संकलन होत असताना दूध उत्पादक संघात मात्र १२00 लीटर दुधाचेच संकलन करण्यात येते. शासनाच्या नियम व अटी याकरिता कारणीभूत आहेत. शासकीय दूध संकलन केंद्रात सर्व नियमांचे पालन होत असल्याने दूध उत्पादक दूध विक्रीला आणीत नाहीत. तसेच खासगी डेअरीमध्ये शेतकर्यांना जास्त भावही मिळतो. त्यामुळे खासगी डेअरीकडे दूध उत्पादकांचा ओढा जास्त असतो. दूध उत्पादक संघही यामुळे संकटात सापडले असून, बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
जिल्ह्यातील दूध उत्पादक संघाचे दूध संकलन जवळपास बंद आहे. शासनाच्या नियम व अटीमुळे दूध उत्पादक दूध आणीत नाहीत. तसेच खासगी दूध डेअरी जास्त भाव देत असल्याने दूध उत्पादक त्यांच्याकडे वळतात. शासनाने याबाबत धोरण निश्चित करण्याची गरज आहे.
- रमेश काळे
जिल्हाध्यक्ष, दूध उत्पादक संघ