आता ‘रेमडेसिविर’ची मेडिकलमधून विक्री नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 11:03 AM2021-04-12T11:03:50+5:302021-04-12T11:03:56+5:30
Remedicivir is no longer sold through medical Shops: रेमडेसिविरच्या विक्रीवर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी हा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना सक्रिय रुग्णांचे प्रमाणही पाच हजारांवर आहे. सक्रिय रुग्णांना आवश्यक असणाऱ्या रेमडेसिविर औषधीचा काळाबाजार रोखण्यासाठी आता या इंजेक्शनची मेडिकल स्टोअर्समधून विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. या औषधीचा पुरवठादारांकडून थेट कोविड रुग्णालयांना पुरवठा करण्यात येणार आहे. रेमडेसिविरच्या विक्रीवर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी हा निर्णय घेतला आहे.
रेमडेसिविर इंजेक्शनचा जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला आहे. कमीअधिक ११३० रुपये किंमत असलेल्या या औषधीची अलीकडे प्रचंड मागणी असल्याने बाजारात याची चढ्या भावाने विक्री होत आहे. याबात वारंवार तक्रारी येत असल्याने अखेर जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी मेडिकलमधून होणाऱ्या विक्रीस मनाई केली आहे. त्याऐवजी थेट कंपन्या वा स्टॉकिस्ट कोविड रुग्णालयांना रेमडेसिवीरचा पुरवठा करण्यात येणार आहे.
नोडल अधिकारी नियुक्त
रेमडेसिवीरच्या पुरवठ्यावर देखरेख व सनियंत्रणासाठी दोन नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हास्तरीय नोडल अधिकारी म्हणून बुलडाणा एसडीओ राजेश्वर हांडे व अन्न औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त अशोक बर्डे यांचा समावेश आहे. या पुरवठ्यावर देखरेख व तुटवडा होणार नाही याची दक्षता घेण्याची जवाबदारी या नोडल अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.