सलग दुसऱ्या वर्षी रेणुकादेवी चैत्र यात्रोत्सव रद्द!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:32 AM2021-04-19T04:32:05+5:302021-04-19T04:32:05+5:30

शहराचे आराध्य दैवत रेणुकादेवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रोत्सवाला लाखो भाविक दरवर्षी येतात. यामुळे येथे दरवर्षी प्रसाद, मिठाई, खेळणी, कटलरी साहित्य, ...

Renuka Devi Chaitra Yatra canceled for second year in a row! | सलग दुसऱ्या वर्षी रेणुकादेवी चैत्र यात्रोत्सव रद्द!

सलग दुसऱ्या वर्षी रेणुकादेवी चैत्र यात्रोत्सव रद्द!

googlenewsNext

शहराचे आराध्य दैवत रेणुकादेवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रोत्सवाला लाखो भाविक दरवर्षी येतात. यामुळे येथे दरवर्षी प्रसाद, मिठाई, खेळणी, कटलरी साहित्य, भांडे आदींसह एकूण बाजारपेठ व प्रवासी वाहतूक, हॉटेल, शीतपेय व्यवसायाला मोठा लाभ होतो. लाखो रुपयांची उलाढाल या यात्रेनिमित्ताने होते. तथापि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून सर्वदूर ख्याती असल्याने नवस फेडणे, दर्शनासाठी मोठी गर्दी यानिमित्ताने शहरात होत असते. मात्र, कोरोनामुळे गतवर्षी यात्रा रद्द झाली होती. त्यापश्चातही अनेक दिवस मंदिर बंद असल्याने याचा फटका मंदिर परिसरातील दुकानदारांना बसला आहे. त्यामुळे यंदाच्या यात्रेतून तरी दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, यंदाही चैत्र यात्रा व इतर सर्व सार्वजनिक उत्सव रद्द झाल्याने सर्वांचाच हिरमोड झाला आहे. यात्रा रद्द करण्याबाबत श्री रेणुका देवी संस्थान चिखली विश्वस्त मंडळ व जिल्हा प्रशासनाचा निर्णय झाला आहे. भाविकांनी कठोर निर्बंध पाळत घरीच राहण्याचे आवाहन व मंदिरात गर्दी न करण्याच्या सूचना या पृष्ठभूमीवर देण्यात आल्या आहे. 'विदर्भासह महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रेणुका देवीच्या वासंतिक नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने हजारो वर्षांपासून चालत आलेला आदिशक्ती श्री रेणुका देवी चैत्र पौर्णिमा उत्सव, वहनोत्सव नगर परिक्रमा आज देशापुढील कोरोना आपत्तीमुळे होणार नाही, परंपरा ही जपूच पण सार्वजनिक सोहळा करता येणार नाही, कोणालाच सहभागी होता येणार नाही', असे संस्थानच्या विश्वस्त मंडळाने स्पष्ट केले आहे.

सर्वच कार्यक्रम रद्द

चिखलीत चैत्र पौर्णिमा यात्रोत्सवानिमित्त देवीचे वहन मिरवणूक व नगर परिक्रमा या यात्रेचे प्रमुख आकर्षण असते. यावर्षी २७ एप्रिलला हा सोहळा नियोजित होता. मात्र, देवीचे वहन मिरवणूक निघणार नाही. यात्रोत्सवानिमित्त दरवर्षी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. २७ एप्रिल पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी ७ वाजता मोजक्या लोकांच्या उपस्थिातीत देवीची आरती होईल. त्याचवेळी सर्व भाविकांनी आपापल्या घरी देवीच्या प्रतिमेसमोर पूजा, आरती करावी, याचे प्रतीक म्हणून दारासमोर अंगणात ५ दिवे लावावेत आणि प्रामुख्याने कोरोना विषाणू संकटाशी लढा देण्याची शक्ती आम्हाला दे, अशी प्रार्थना देवीकडे करावी, असे आवाहन संस्थानने केले असून देवीच्या चैत्र नवरात्राचे उपवास २७ एप्रिलला सुटतील, असे स्पष्ट केले आहे.

Web Title: Renuka Devi Chaitra Yatra canceled for second year in a row!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.