धाड ते दाताळा रस्त्याची दुरुस्ती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:43 AM2021-02-25T04:43:58+5:302021-02-25T04:43:58+5:30
बुलडाणा : धाड ते जामठी गिरडा फाटामार्गे दाताळा रस्त्याची गत काही दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे अपघात ...
बुलडाणा : धाड ते जामठी गिरडा फाटामार्गे दाताळा रस्त्याची गत काही दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे अपघात वाढले आहेत. या रस्त्याची दुरुस्ती व रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेल, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मनोज दांडगे यांनी सार्वजनिक बांधकाम अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. येत्या २५ दिवसात दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास जामठी येथे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी निवेदनात दिला आहे.
धाड ते जामठी, गिरडामार्गे दाताळा रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे दळणवळण ठप्प झाले आहे. रस्त्याअभावी पर्यटन विकास थांबला आहे. या रस्त्यावर विविध शाळा, महाविद्यालय आहेत. त्यामुळे मुलांना ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. या अगोदर गिरडा फाटा, पान्हेर ते दाताळा ४५ किमी लांबीचा व अर्थसंकल्प २०१८-१९ अंतर्गत एकूण ८.४०० किमी रस्ता सुधारण्याचे काम मंजूर झालेले आहे. या रस्त्याचे लवकरच काम सुरू हाेइल, असे आश्वासन देण्यात आले हाेते. मात्र, अजूनही रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. रस्त्यावर अनेक ठिकाणी माेठमाेठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा १६ मार्च रोजी सकाळी १० वाजेपासून जामठी येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनोज दांडगे यांनी दिला आहे.