बोगस बियाण्यांचा अहवाल गुलदस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 12:52 AM2017-09-09T00:52:33+5:302017-09-09T00:52:59+5:30
जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोयाबीनला शेंगाच धरल्या नसल्याचे प्रकार गेल्या १५ दिवसांपासून समोर येत आहे. तसेच कृषी विभागाकडे शेतकर्यांनी तक्रारीसुद्धा केल्या आहेत; परंतु आतापर्यंंत अशा सोयाबीनची तालुकास्तरावरून केवळ पाहणीच झाली असून, कृषी विभागाने वांझोट्या सोयाबीनचा अहवाल गुलदस्त्यातच ठेवला आहे.
ब्रह्मनंद जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोयाबीनला शेंगाच धरल्या नसल्याचे प्रकार गेल्या १५ दिवसांपासून समोर येत आहे. तसेच कृषी विभागाकडे शेतकर्यांनी तक्रारीसुद्धा केल्या आहेत; परंतु आतापर्यंंत अशा सोयाबीनची तालुकास्तरावरून केवळ पाहणीच झाली असून, कृषी विभागाने वांझोट्या सोयाबीनचा अहवाल गुलदस्त्यातच ठेवला आहे.
जिल्ह्यात शेतकर्यांनी जवळपास ३ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली आहे. सध्या सोयाबीनच्या शेंगा पक्वतेच्या अवस्थेत आहेत. झाडाला शेंगा जास्त व दाणेदार आल्या तर उत्पादनात वाढ होते; मात्र जिल्ह्यातील काही भागात सोयाबीनला शेंगाच आल्या नसल्याचा प्रकार समोर आला आहे. सोयाबीनला शेंगा आल्या नसल्याच्या तक्रारी गेल्या १५ दिवसांपासून शेतकरी कृषी विभागाकडे करत आहेत. शेतकर्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांची सोयाबीन बियाणे शेतात टाकली आहेत, तर काहींनी घरगुती सोयाबीन बियाणेसुद्धा वापरले आहे; मात्र बुलडाणा, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा या भागात सोयाबीनला शेंगा आल्या नसल्याचा प्रकार सर्वाधिक आहे. सोयाबीनला शेंगा न लागलेल्या शेतात कृषी विभागाने तालुकानिहाय पाहणी केली आहे; मात्र त्याचा कुठलाच अहवाल आतापर्यंत पूर्ण करण्यात आला नाही. तसेच सोयाबीनला शेंगा आल्या नसल्याचा अहवाल तालुकास्तरावरून जिल्हा परिषदच्या कृषी विभागाकडेसुद्धा पाठवण्यात आला नसल्याची माहिती आहे. कृषी विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे शेतकर्यांचे नुकसान होत आहे. सोयाबीनला शेंगा न लागल्यामुळे शेतकर्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरल्या जात आहे. काही दिवसातच सोयाबीन कापणीला सुरुवात होणार असून, आता यापुढे सोयाबीनला शेंगा येण्याची शक्यता नाही.
कृषी विभागाचे कृषी विद्यापीठाच्या पाहणीकडे बोट
जिल्ह्यात सोयाबीनला शेंगा न आल्याचा प्रकार वाढला असून, अशा सोयाबीनची कृषी विभागाकडून तालुकास्तरावरून पाहणी करण्यात आली आहे; मात्र त्यावर कुठल्याच प्रकारचा निर्णय अद्याप कृषी विभागाने दिला नाही. त्यामुळे पुढील कार्यवाहीसाठी कृषी विभागाकडून कृषी विद्यापीठाकडे बोट दाखवल्या जात आहे. त्यामुळे आता सोयाबीनला शेंगा न आलेल्या शेताची पाहणी पुन्हा कृषी विद्यापीठाकडून होणार आहे.
शेंगा न लागलेल्या झाडांचीही काळजी
सोयाबीनला शेंगा न लागलेल्या झाडांचा सर्व्हे होईल, या आशेने शेतकरी शेंगा नसलेल्या झाडांचीही काळजी घेत आहेत. हरण, रोही यासारख्या वन्य प्राण्यांपासून शेंगा न लागलेले सोयाबीनचे झाडे नष्ट होऊ नये, म्हणून शेतकरी खबरदारी घेत असल्याचे दिसून येत आहे. शेंगा न लागलेल्या सोयाबीनच्या या झाडांचा शासन केव्हा सर्व्हे करणार, याची प्रतीक्षा शेतकर्यांना लागलेली आहे.
सोयाबीनला शेंगा न लागलेल्या शेताची तालुकास्तरावरून पाहणी करण्यात आलेली आहे. यापुढे आता कृषी विद्यापीठाकडून पाहणी करण्यात येईल.
- पी.के. लहाळे,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा.