बुलडाणा ईव्हीएम घोटाळ्याबाबत निवेदन करा!
By ram.deshpande | Published: July 26, 2017 02:47 AM2017-07-26T02:47:12+5:302017-07-26T02:47:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बुलडाणा येथील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये झालेल्या इव्हीएम घोटाळ्याबाबत सभागृहात निवेदन करण्याचे निर्देश सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी राज्य सरकारला दिले.
काँग्रेस सदस्य संजय दत्त यांनी इव्हीएम घोटाळ्याबाबत स्थगन प्रस्ताव मांडला होता. सभापतींनी हा स्थगन प्रस्ताव फेटाळला. मात्र, विषयाचे गांभीर्य लक्षात घेत दत्त यांना या विषयावर बोलण्याची परवानगी दिली. इव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप करताना दत्त म्हणाले, बुलडाणा जिल्हा परिषदेतील बुथ क्रमांक ५६, सुलतानपूर येथे फेब्रुवारी २०१७ साली मतदान झाले. इथल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार आशा जोरे यांचे नारळ हे निवडणूक चिन्ह होते. येथील निवडणुकीबाबत जोरे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. बुलढाणा येथील प्रकरण उघडकीस येण्यापूर्वीही इव्हीएम घोटाळा झाल्याच्या तक्रारी निवडणूक आयोकाकडे करण्यात आल्या होत्या. मात्र, आयोगाने त्या तक्रारींची दखल घेतली नाही. बुलढाणा येथील तपासाने इव्हीएम घोटाळ्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे दत्त म्हणाले. संजय दत्त यांच्या स्थगन प्रस्तावाची दखल घेत सभापती निंबाळकर यांनी राज्य सरकारला या संदर्भात निवेदन करण्याचे निर्देश दिले.
अपक्ष उमेदवाराचे मत जात होते भाजपला!
निवडणूक अधिका-यांनी तपासणी केली असता नारळ या चिन्हासमोरील बटण दाबले असता भाजपा उमेदवाराला मत जात असल्याचे दिसून आले. तसा अहवाल बुलडाणाचे जिल्हाधिकारी डॉ. विजया झाडे यांनी निवडणूक आयोगाला दिला आहे. या अहवालाने इव्हीएम घोटाळा होवू शकतो हे सिद्ध झाला आहे. राज्यातील स्थानिक संस्था निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपाच्या बाजून हा इव्हीएम घोटाळा झाला आहे, असा आरोप दत्त यांनी यावेळी केला.