आठ दिवसात अहवाल द्या, अन्यथा शासन निर्णय घेईल!
By admin | Published: November 18, 2014 11:59 PM2014-11-18T23:59:31+5:302014-11-18T23:59:31+5:30
बिर्ला कॉटसीनबाबतच्या बैठकीत उद्योगमंत्र्यांचा आदेश.
खामगाव (बुलडाणा): येथील १ हजार २00 कामगारांवर उपासमारीची वेळ आणणार्या बिरला कॉटसीन (वर्धन सिन्टेक्स) वर उद्योगमंत्री ना.प्रकाश मेहता यांनी कठोर ताशेरे ओढले व आठ दिवसात कंपनी अहवाल द्या, अन्यथा कंपनीचा निर्णय महाराष्ट्र शासन घेईल, असे आदेश त्यांनी दिले.
खामगाव विधानसभा मतदार संघाचे आ.अँड.आकाश फुंडकर यांच्या मागणीवरून उद्योगमंत्री प्रकाश मेहता यांनी आज १८ नोव्हेंबर रोजी मुंबई येथील त्यांच्या मंत्रालयातील दालनात बिरला कॉटसीन सुरू करण्याबाबत बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी उपरोक्त आदेश दिले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आ.भाऊसाहेब फुंडकर, प्रधान सचिव गगरा, बिरला कॉटसीनचे संचालक दीक्षित, उद्योगपती बी.के. काबरा, चंदुसेठ मोहता यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पश्चिम विदर्भात सर्वात मोठी एमआयडीसी खामगावला आहे. या एमआयडीसीत सन १९८0 मध्ये बिरला कॉटसीन (वर्धन सिन्टेक्स) ही धागा बनविणारी मोठी कंपनी सुरू झाली. या कंपनीच्या भरवशावर तब्बल १ हजार २00 कामगारांचे कुटुंब अवलंबून होते; परंतु चार महिन्यांपूर्वी व्यवस्थापनामुळे ही कंपनी बंद पडली. कामगारांचे हित व त्यांचे भविष्य न पाहताच कंपनी बंद करण्यात आली. यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली. कंपनी सुरू करण्यासाठी अनेक कामगारांनी आ.भाऊसाहेब फुंडकर व आ.अँड. आकाश फुंडकर यांच्याकडे मागणी केली.