खामगावातील १०० कोटींच्या भुखंडावर लोकप्रतिनिधींचा डोळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 04:05 PM2020-02-12T16:05:00+5:302020-02-12T16:05:04+5:30
याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या नगरसेवकांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: स्थानिक नगर पालिकेची १७ फेब्रुवारी सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. या सभेत बिर्ला अॅग्रो कॉटसीन इंडियाचा भाडेपट्टा नुतनीकरण करण्यासंदर्भातील विषय सभेच्या विषय सुचीवर ठेवण्यात आला आहे. १०० कोटी रुपयांची मालमत्ता असलेल्या या जमीनीचे लचके तोडण्याचा स्थानिक लोकप्रतिनिधींचा डाव आहे. यामध्ये मुख्याधिकारी यांची भुमिका संशयास्पद असल्याने याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या नगरसेवकांनी केली आहे.
सोमवारी सायंकाळी ५ वाजता माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने यांच्यासह कॉंग्रेस व मित्र पक्षाच्या नगरसेवकांनी बुलडाणा येथे जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांची भेट घेतली. बिर्ला कॉटसीन संदर्भात तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली. यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक देवेंद्र देशमुख, भारिपचे नगरसेवक विजय वानखडे, कॉंग्रेस नगरसेवक इब्राहिम खॉं सुभान खॉं, नगरसेवक अब्दुल रशीद अब्दुल लतीफ, नगरसेवक भूषण शिंदे उपस्थित होते.
खामगाव नगर पालीकेच्या मालकीचा नझुल शिट नं.४१ अ भुमापन क्रं. १५, १६ व नझुल शिट नंबर ४१ सी भुमापन क्रं. ४ मधील बिर्ला अॅग्रो कॉटसीन इंडियाचा भाडेपटट नुतनीकरण संदर्भात नगर पालीकेच्या १७ फेब्रुवारी रोजीच्या सर्व साधारण सभेत विचार विनीमयासाठी ठेवण्यात आला आहे. सध्याच्या बाजार भावाप्रमाणे बिर्ला कॉटसीनची मालमत्ता ही जवळपास १०० कोटी पेक्षा जास्त रुपयांची आहे. ही जागा खामगांव शहराच्या मध्यस्थानी असून जागेच्या लगत बसस्थानक, रेल्वे स्टेशन, सामान्य रुग्णालय, शाळा, महाविद्यालय यासह इतर महत्वाच्या संस्था आहेत.
प्रदिर्घ कालावधीपासून या जागेचा औद्योगिक वापर बंद झाल्यामुळे ही जागा रिकामी पडलेली आहे. नगर परिषदेने बिर्ला कॉटसीनला ज्या उदद्ेशाकरीता जागा लीजवर दिली होती तो उदद्ेश देखील राहिलेला नाही व लीज धारकाकडुन नगर परिषदेने अनेक वषार्पासून थकित भाडे सुध्दा वसुल केलेले नाही.
असे असतांना १७ फेब्रुवारीच्या नगर परिषदेच्या सभेमध्ये बिर्ला कॉटसीनच्या जागेची लीज वाढवुन देण्याचा विषय राजकीय दबावाखाली सभेमध्ये ठेवण्यात आला आहे. असा आरोप करण्यात आला आहे.
बिर्ला कॉटसीन संदर्भातील कोणतीही गैरकायदेशीर टिप्पणी दिलेली नाही. कायदेशीर बाबी गृहीत धरूनच टिप्पणी तयार केली आहे. बिर्ला कॉटसीन संदर्भातील विषयाला मान्यता द्यायची अथवा नाही, हा अधिकार सभेचा आहे.
- धनंजय बोरीकर
मुख्याधिकारी, नगर परिषद