५० फूट विहिरीत पडलेल्या अस्वलाला दिले जीवनदान; देव्हारी गावाजवळील घटना
By संदीप वानखेडे | Published: May 25, 2024 04:07 PM2024-05-25T16:07:12+5:302024-05-25T16:07:45+5:30
तब्बल १० तास सुरू हाेते बचाव अभियान.
संदीप वानखडे, बुलढाणा : ज्ञानगंगा अभयारण्यातील देव्हारी गावाजवळ असलेल्या एका शेतातील विहिरीत एक अस्वल २४ मे राेजी सायंकाळी पडले. १० तासांच्या बचाव अभियानानंतर या अस्वलाला बाहेर काढण्यात आरएफओ चेतन राठोड व त्यांच्या पथकाला यश मिळाले.
अस्वलासाठी पोषक वातावरण असल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य मोठ्या प्रमाणात अस्वलांचे अधिवास आहे. या अभयारण्यातील देव्हारी गावाजवळ एका शेतातील कठडे नसलेल्या ५० फूट खोल विहिरीत अस्वल पडले होते. ही बाब काल शुक्रवारी सायंकाळी शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ वन्यजीव विभागाला माहिती दिली. वन्यजीव विभागाचे कर्मचारी तसेच प्रादेशिक वन विभागाची रेस्क्यू टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. परंतु, तोपर्यंत अंधार झाला होता. विहिरीत जवळपास १० फूट पाणी असल्याने अस्वलाला बेशुद्ध करून बाहेर काढणे अशक्य होते. त्यामुळे आरएफओ चेतन राठोड यांनी अस्वलाला फिजिकल रेस्क्यू करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले.
बचाव पथकाला करावी लागली कसरत-
विहिरीत मोटर लावून पाणी उपसण्याचा प्रयत्न केला. परंतु, अस्वलाने पाइप फोडून टाकले. त्यानंतर विहिरीत पिंजरा टाकण्यात आला; पण अस्वल हुलकावणी देत होते. लाकडी शिडी तयार करून ती विहिरीत टाकली तरीही अस्वल बाहेर येत नव्हते. शेवटी दोरीची शिडी विहिरीत टाकण्यात आली आणि त्याच्या मदतीने शनिवारी सकाळी ५ वाजेच्या सुमारास अस्वल विहिरीतून सुखरूप बाहेर निघून जंगलाच्या दिशेने पळून गेले.
ही बचाव माेहीम आरएफओ चेतन राठोड यांच्या मार्गदर्शनात वनपाल संजय राठोड, वनपाल समाधान मांटे, रेस्क्यू टीमचे संदीप मडावी, अमोल चव्हाण, वन्यजीव विभागाचे नीतेश गवई, राजेंद्र सूर्यवंशी, प्रवीण भांडे, समाधान गुगळे, गोरक्षसनाथ जगताप, संजीवनी खारोडे यांच्यासह वनमजूर यांनी पार पाडली.