जलाशयांनी गाठला तळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2016 02:26 AM2016-03-22T02:26:08+5:302016-03-22T02:26:08+5:30
मोठे, मध्यम व लघू प्रकल्प : सरासरी ९.४0 टक्के जलसाठा शिल्लक.
बुलडाणा : मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. यंदाही जिल्ह्यात सुरुवातीला चांगला पाऊस आला; मात्र पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरविल्यामुळे आज रोजी जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्या जिल्ह्याखालील ९१ जलाशयात केवळ 0९.४0 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जवळपास सर्वच जलाशयांनी तळ गाठला आहे. परिणामी, उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यावर जलसंकट उभे ठाकले आहे. तीन मोठे प्रकल्प आणि सात मध्यम आणि ७४ लघू प्रकल्पात या प्रकल्पातील पाणीसाठा आता झपाट्याने कमी होत आहे. पिण्यासाठी आणि शेतीसाठी वर्षभर या प्रकल्पामधून पाणी वापरण्यात येते. त्यामुळे पावसाच्या सुरुवातीला भरलेली ही जलाशये मार्चपर्यत तळ गाठते. शिवाय मार्च अखेरपासून तापमानामध्ये वाढ होत असल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठय़ा प्रमाणात होते. यामुळे जलपातळीत कमालीची घट आढळून आली आहे. नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा या मोठे प्रकल्पात सरासरी १0.२८ टक्के, पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, तोरणा व उतावळी या मध्यम प्रकल्पात सरासरी 0४.९0 टक्के इतका जलसाठा आहे. उर्वरित ७४ लघू प्रकल्पामध्ये केवळ 0५.६९ टक्के इतकेच पाणी शिल्लक आहे. पाणी टंचाईची झळ ही खर्या अर्थाने लघू प्रकल्प कोरडे झाल्यानेच जाणवत आहे. वन्यप्राणी, पाळीव प्राणी यांना पिण्यासाठी लघू प्रकल्पाचाच आधार घ्यावा लागतो. शिवाय या प्रकल्पातील पाण्याचा वापर हा प्रामुख्याने लोकवस्तीत पिण्यासाठी मोठय़ा प्रमाणात केला जातो. परिणामी लघु प्रकल्प आटल्यामुळे नागरिकांस वनप्राण्यांनाही याचा फटका जणवत आहे. मोठे व माध्य. प्रकल्पात मोठय़ा पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असून, धरणातील जलस्तर घटल्याने येत्या उन्हाळ्याच्या तीन महिन्यात जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागात पाणीबाणी आणखी गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.