४५० गावे हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:41 AM2021-09-17T04:41:25+5:302021-09-17T04:41:25+5:30
बुलडाणा : भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यभर स्वच्छ भारत मिशनअंतर्गत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा ...
बुलडाणा : भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यभर स्वच्छ भारत मिशनअंतर्गत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या मार्गदर्शनात बुलडाणा जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. या अभियानांतर्गत ४५० गावे हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे़
हे अभियान १५ ऑगस्ट २०२१ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान राबविले जाणार आहे.
अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त बुलडाणा जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यासाठी तालुकास्तरावर प्रत्येक पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना नोडल ऑफिसर म्हणून नेमण्यात आले आहे. या अभियानात महिनानिहाय हगणदारीमुक्त अधिक गावे करण्याबाबत नियोजन असून जानेवारी २२ अखेर जिल्ह्यातील ४५० हगणदारीमुक्त गावे करण्यात येणार आहे. यासाठी पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंदनसिंह राजपूत यांच्या नियंत्रणात सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.
१५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान स्थानिक स्तरावरील पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था, बचत गट, सामाजिक कार्यकर्ते यांचे सहभागातून स्वच्छता हा सेवा उपक्रम राबविताना सामूहिक श्रमदान करण्यात येणार आहे. एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घालण्याबाबत असा ठराव प्रत्येक ग्रामपंचायतीत घेण्यात येणार आहे.
सुजलाम् अभियान राबवणार
स्थायित्व व सुजलाम् अभियान याअंतर्गत जिल्ह्यात १०० दिवसांचे अभियान राबवले जाणार आहे. यामध्ये गावागावांत वैयक्तिक व सामुदायिक स्तरावर शोषखड्ड्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच लोकसहभागातून नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती करण्यात येऊन वाढीव नवीन कुटुंबांकडे शौचालय असल्याबाबतची खात्री करण्यात येणार आहे. २६ जानेवारी २०२२ रोजी गावागावांतून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येऊन स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. यासोबतच शालेय स्पर्धा, मैला गाळ व्यवस्थापन, पदाधिकारी यांचा सरपंचांशी ऑनलाइन संवाद आदी विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
अभियान यशस्वी करण्याचे आवाहन
स्वतंत्र भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कोविड-१९ अंतर्गत मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायती व मोठ्या संख्येने ग्रामस्थ, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग नोंदवून हे अभियान यशस्वी करण्याबाबतचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मनीषा पवार व उपाध्यक्ष कमलताई बुधवंत यांनी केले आहे.