गाळ उपसा मोहिमेस पालिका कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचे वेतन देण्याचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 12:17 PM2019-04-08T12:17:53+5:302019-04-08T12:17:59+5:30
खामगाव : येथील पुरातन जनुना तलावाच्या गाळ उपसा मोहिमेस हातभार म्हणून नगर पालिका कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन देण्याचा संकल्प केला आहे.
- अनिल गवई
खामगाव : येथील पुरातन जनुना तलावाच्या गाळ उपसा मोहिमेस हातभार म्हणून नगर पालिका कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन देण्याचा संकल्प केला आहे. लोकसहभागातून जनुना तलावातील गाळ काढण्यात येणार असून, या मोहिमेला पालिका कर्मचाऱ्यांचाही हातभार आता लागणार आहे. जनुना तलावातील गाळ काढण्यासाठी रोटरी क्लबने पुढाकार घेतला असून, या मोहिमेसाठी भारतीय जैन संघटनेने मोफत जेसीबी आणि पोकलॅन्ड मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. हे येथे उल्लेखनिय!
जलसंवर्धनाची गरज ओळखून भारतीय जैन संघटनेच्यापुढाकारातून बुलडाणा जिल्ह्यातील विविध धरणातील गाळाचा उपसा करण्यात येत आहे. गत वर्षांत विविध धरण आणि तलावातील लाखो ब्रास गाळाचा उपसा करण्यात आला. त्याचधर्तीवर खामगाव येथील जनुना तलावातील गाळाचा उपसा करण्यास प्रारंभ करण्यात आला. रोटरी क्लबच्या पुढाकारातून या तलावातील गाळाचा उपसा केला जाणार आहे. यामध्ये विविध सामाजिक संघटनांचा सहभाग लाभत असतानाच, नगर पालिका कर्मचाºयांनी एक दिवसाचे वेतन देण्याचा संकल्प केलाय. जनसहभागातून ही मोहिम यशस्वी करण्यासाठी विविध सामाजिक संघटना सोबतच पर्यावरण प्रेमी आणि कर्मचारी पुढाकार घेताहेत.
केमीस्ट अॅन्ड ड्रगीस्ट असोसिएशनची मदत!
जनुना तलावातील गाळ उपसा मोहिमेस हातभार लागावा म्हणून केमीस्ट अॅन्ड ड्रगीस्ट असोसिएशनच्यावतीने १ लाख ११ हजार रुपयांची मदत देण्यात आली. असोसिएशनचे राज्य सचिव अनिल नावंदर यांनी शनिवारी ही मदत जाहीर केली. त्यापाठोपाठ इतर सामाजिक संघटनाही या मोहिमेत सहभागी होत आहेत.
ऐतिहासिक जनुना तलावातील गाळाचा उपसा करण्यासाठी नगर पालिका प्रशासनाने विनाअट परवानगी दिली आहे. नगर पालिका कर्मचारी संघटना देखील गाळ उपसा मोहिमेत सहभागी आहे. गाळ उपसा मोहिमेसाठी हातभार म्हणून कर्मचाºयांना एक दिवसाचे वेतन देण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला अनेकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
- आनंदमोहन अहीर, अध्यक्ष, नगर परिषद कर्मचारी संघटना, खामगाव.