जबाबदारी राज्य शासनाचीच; आ. महालेंचे राजकारणविरहित सहकार्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:26 AM2021-06-02T04:26:20+5:302021-06-02T04:26:20+5:30
चिखली : चिखली व धाड येथे कोविड सेंटर सुरू करून आमदार श्वेता महाले कोरोना रुग्णांची मोफत सेवा करीत आहेत. ...
चिखली : चिखली व धाड येथे कोविड सेंटर सुरू करून आमदार श्वेता महाले कोरोना रुग्णांची मोफत सेवा करीत आहेत. वस्तुत: कोरोना नियंत्रणाची जबाबदारी राज्य शासनाची असताना आ. महाले या कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता राज्य शासनाला मदत करीत आहेत. त्यामुळे कोरोना संकटात शासनाच्या कामातील उणिवा दाखविताना आधार सेंटरच्या माध्यमातून शासनाला त्यांची मदतच होत आहे, असा पलटवार पं.स. सभापती सिंधू तायडे यांनी माजी आमदार राहुल बोंद्रेंच्या टीकेला उत्तर देताना केला आहे.
या अनुषंगाने तायडे यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, आमदार श्वेता महाले यांच्या प्रयत्नांतून सुरू झालेल्या आधार कोविड केअर सेंटरला मिळालेल्या शासकीय सुविधा आ. महाले यांनी कुठेही नाकारलेल्या नाहीत. प्रत्येक प्रसिद्धिपत्रकात आणि भाषणातूनसुद्धा त्यांनी आधार कोविड सेंटर हे शासन व लोकसहभागातून होत असल्याचे म्हटले आहे. एव्हढेच नव्हे, तर ज्यावेळी आधार कोविड सेंटरला जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी मागितली त्याच पत्रात मनुष्यबळ आणि औषधी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी केलेली आहे. या यार्श्वभूमीवर त्यांच्यावर माजी आमदारांनी केलेला आरोप खोटा व बिनबुडाचा असल्याचे या प्रसिद्विपत्रकात म्हटले आहे.
दरम्यान, चिखली आणि धाड येथील कोविड केअर सेंटरला शासनाने केवळ मनुष्यबळाच्या नावावर डॉक्टर, नर्स व कोरोना प्रोटोकॉलप्रमाणे औषधी मिळालेली आहे. इतर मनुष्यबळ व महागडी औषधी संस्थेने उपलब्ध केली. सोबतच इमारत चिखली येथे नगरपालिकेची, तर धाड येथे सहकार विद्यामंदिराची मिळलेली आहे. त्यातही या इमारतीमध्ये इलेक्ट्रिक फिटिंग, स्वच्छता आणि रुग्णालयासाठी लागणाऱ्या सुविधा आ. महाले यांनी स्वत: व लोकसहभागातून दिल्या आहेत. यात शासनाचा एक रुपयासुद्धा सहभाग नाही. याव्यतिरिक्त कोविड केअरसाठी लागणाऱ्या बेडसाठी सुमारे दोन लाख रुपये, अंथरूण, पांघरूण, जेवण, दररोजची स्वच्छता, इतर व्यवस्था, रुग्ण शुश्रूषा, रुग्णांच्या इतर तपासण्या व चाचण्या, तेथील सर्व आधारभूत सुविधा, तसेच तेथील सर्व व्यवस्थापन आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ व साहित्य आ. महाले यांनी स्वत: आणि लोकसहभागातून उभे केले आहे, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे. कोरोना महामारीला आटोक्यात आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष व आ. महाले पहिल्यापासून प्रयत्न करीत आहेत. ज्या-ज्या ठिकाणी राज्य सरकार चुकले त्या-त्या ठिकाणी चूक दाखवून ती दुरुस्ती करून घेणे म्हणजे टीका करणे नसून, वाट दाखवविण्याचे काम विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाने कोरोना महामारीच्या काळात केले आहे. सोबतच राज्य सरकारच्या बरोबरीनेच कोरोना नियंत्रणासाठी राज्यभरात अलगीकरण कक्ष, कोविड केअर सेंटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, ऑक्सिजन प्लांट उभे करणे आदी कामे भाजपाने केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.