खामगाव शहरातील १३ घंटागाडी पूर्ववत करा मनसे आक्रमक, मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन
By अनिल गवई | Published: February 26, 2024 04:45 PM2024-02-26T16:45:42+5:302024-02-26T16:45:54+5:30
घंटागाडी सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
खामगाव: घन कचरा व्यवस्थापनासाठी खामगाव पालिकेने सुरू केलेल्या १३ घंटागाडी बंद करण्यात आल्या आहेत. या घंटागाडी पूर्ववत करण्यासाठी सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मुख्याधिकार्यांना निवेदन सादर करण्यात आले. घंटागाडी सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनानुसार, खामगाव शहरातील घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याकरिता दरवर्षी खामगाव नगरपालिकेकडून घनकचरा व्यवस्थापनाचा कंत्राट दिल्या जातो त्यामध्ये अनेक वर्षापासून ५३ घंटा गाड्या व काही ट्रॅक्टरचा समावेश असतो. परंतु मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात खामगाव नगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापनाचा कंत्राट काढताना ५३ ऐवजी चाळीस घंटा गाड्यांचा व काही ट्रॅक्टरचा समावेश केला आहे. खामगावातील कचरा गोळा करण्याची जबाबदारी घनकचरा व्यवस्थापन कंत्राटदार एस आर ग्रीनवे एम्पायर यांच्याकडे आहे. परंतु संबंधित कंत्राटदार स्वतःच्या आर्थिक फायदा करिता चाळीस घंटागाड्याऐवजी फक्त दहा ते बाराच घंटागाड्या चालवत आहेत.
खामगाव शहरातील नागरिकांना घरातील जमा झालेला कचरा नाईलाजास्तव रस्त्यावर आणून टाकावा लागत आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागात ठिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. दरम्यान, कंत्राटदाराकडून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता चाळीस ऐवजी फक्त दहा ते बाराच घंटा गाड्या संबंधित ठेकेदार चालवत असल्यामुळे तसेच चांदमारी भागातील टेकडीवर संबंधित ठेकेदाराने मनमर्जीप्रमाणे नवीन अवैध डंपिंग ग्राउंड तयार केल्याने व घंटागाडी कामगारांना किमान वेतनुसार पगार देत नसल्याने त्वरित संबंधित ठेकेदाराला कळ्या यादीत टाकून त्यांचे कोणतेही बिल अदा करण्यात येऊ नये. यासह विविध मागण्या चे निवेदन मनसेच्या वतीने खामगाव नगरपालिकेला सोमवारी दिले. यात २९ फेब्रुवारी रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुध्दा करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनात दिला आहे.