सलग दुसऱ्या वर्षीही पवित्र रमजान महिन्यात निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:34 AM2021-04-17T04:34:48+5:302021-04-17T04:34:48+5:30
रोजे व नमाज पठण होतेय घरातच जानेफळ : मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यास १४ एप्रिल २०२१ पासून सुरुवात झाली ...
रोजे व नमाज पठण होतेय घरातच
जानेफळ : मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यास १४ एप्रिल २०२१ पासून सुरुवात झाली आहे. शुक्रवारी ३ रोजे पूर्ण झाले असून सलग दुसऱ्या वर्षीही पवित्र रमजान महिन्यात निर्बंध लागल्यामुळे पुन्हा रोजे व नमाज पठण घरीच होत असल्यामुळे मुस्लिम बांधवांचा हिरमोड झाला आहे.
कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने १४ एप्रिल २०२१ पासून कडक संचारबंदी लागू केली आहे. योगायोग म्हणजे १४ एप्रिलपासूनच पवित्र रमजान महिन्याची आणि मराठी नववर्षाची गुढीपाडव्याने सुरुवात झाली आहे. या पवित्र रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधव मशिदीमध्ये एकत्र येऊन नमाज व तराबी पठण करून अल्लाहकडे दुवा मागतात. परंतु सद्यस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता कोरोनावर मात करण्यासाठी यंदाही पवित्र रमजान महिन्यातील नमाज पठण हे मुस्लिम बांधव मशिदीमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणीसुद्धा एकत्र येऊन अदा न करता आपल्या घरातच नमाज पठण करीत आहेत.
मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याला चंद्रदर्शनानंतर दिनांक १४ एप्रिलपासून प्रारंभ झाला आहे. एप्रिल आणि मे महिन्याच्या कडक उन्हात येणारे रोजे (निरंक उपवास) ठेवणाऱ्यांची कसोटी पाहणारेच ठरणार आहेत. सध्या जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट जोमात पसरलेली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत भयानक व झपाट्याने ही लाट पसरत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कोरोना उग्र रूप धारण करू शकतो़ त्यामुळे नागरिकांनीसुद्धा याची खबरदारी घेण्याची आणि विनाकारण घराबाहेर पडून रस्त्यावर फिरणे टाळण्याची गरज निर्माण झालेली आहे.