डोणगाव सरपंच निवडीचा निकाल राखीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 06:50 PM2018-06-09T18:50:58+5:302018-06-09T18:50:58+5:30
डोणगाव : येथील रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी आठ जून रोजी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे.
डोणगाव : येथील रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी आठ जून रोजी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात पूर्वाश्रमीच्या सरपंच अनुराधा धांडे यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यानुषंगाने खंडपीठाने हा निकाल राखीव ठेवण्याबाब आदेशीत केले होते. अनुराधा धांडे यांचे सरपंचपद यापूर्वी कथित गैरप्रकार प्रकरणी अपात्र ठरविण्यात आले होते. त्यासंदर्भात २६ एप्रिल रोजी विभागीय आयुक्तांनी निर्णय दिला होता.एलईडी लाईट खरेदी, मोटारपंप खेरदी, अवैध बांधकाम, अतिक्रमणाच्या प्रकरणात त्यांच्या विरोधात ही कार्यवाही करण्यात येऊन त्यांचे सरपंच पद आमि सदस्यत्व रद्द केले होते. त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंचाच्या निवडीसाठी आठ जून रोजी ही निवडणूक घेण्यात आली होती. यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीचे अध्यासी अधिकारी म्हणून नायाब तहसिलदार पंकज मगर होते. त्यांना सहाय्य करण्यासाठी तलाठी शिवप्रसाद म्हस्के, ग्रामविकास अधिकारी अशोक बुरकुल हे उपस्थित होते. सरपंचपदासाठी उषा विनोद खोडके यांनी आखाडे गटाकडून अर्ज भरला होता तर शिवसेनेकडून पुष्पा नामदेव जाधव यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र बैठकीस १७ सदस्यांपैकी अनुराधा धांडे या अपत्रा असल्याने त्या गैरहजर होत्या. सोबतच सुनील ओंकार आखाडे, संगीता दीपक नंदेवार हे दोन सदस्य गैरहजर असल्याने १४ सदस्यच उपस्थित होते. त्यावेळी गुप्तमतदान पद्धतीने मदान घेण्यात आले. मात्र दरम्यानच्या काळात अनुराधा धांडे यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केल्याने या सरपंच पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे आता हे प्रकरण कोणते वळण घेते याकडे लक्ष लागून आहे. मात्र आठ जूनच्या घडामोडींमुळे डोणगावातील राजकारणात कोण वरचढ या संदर्भात आता चर्चा सुरू आहे. नंदवार यांचा राजीनामा शुक्रवारी वेगवान घडामोडी घडल्या असतानाच शनिवारी सरपंच निवडीसाठीच्या बैठकीस अनुपस्थित असलेल्या संगीता दीपक नंदेवार त्यांच्या पदाचा स्वखुशीने नऊ जून रोजी राजीनामा दिला आहे. डोणगावातील वार्ड क्रमांक तीनचे त्या प्रतिनिधीत्व करीत होत्या.