कमी किमतीत सोन्याची नाणी देण्याच्या बहाण्याने सेवानिवृत्त पोलिसाला १२ लाखांचा गंडा, मारहाणही केली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 09:11 PM2022-03-26T21:11:23+5:302022-03-26T21:15:50+5:30
नकली सोन्याची नाणी, मांडूळ साप आणि काळी जादू करण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या टोळ्या खामगाव तालुक्यातील अंत्रज परिसरात आहेत. आता या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्याचे शुक्रवारच्या घटनेवरून समोर येत आहे.
खामगाव - कमी किमतीत नाणी देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या टोळीने पुन्हा डोकेवर काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कमी किमतीत सोन्याची नाणी देण्याचे आमिष देत एका सेवानिवृत्त पोलीस आणि त्याच्या साथीदाराची १२ लाखांची फसवणूक करण्यात आल्याची घटना शुक्रवारी हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी एका संशयित आरोपीस शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली.
नकली सोन्याची नाणी, मांडूळ साप आणि काळी जादू करण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या टोळ्या खामगाव तालुक्यातील अंत्रज परिसरात आहेत. आता या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्याचे शुक्रवारच्या घटनेवरून समोर येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी राजेंद्र चंदुलाल जाधव (६० ) यांना खोदकामात सापडलेली सोन्याची नाणी कमी किमतीत देण्याचे आमिष देत चिखली रोडवरील निरोड फाट्यावर बोलावण्यात आले. सौदा पक्का झाल्यानंतर राजेंद्र जाधव आपल्या तीन साथीदारांना घेऊन निरोड फाट्यावर पोहोचले. त्यावेळी या फाट्यावर आधीच दडून बसलेल्या १० ते १२ अज्ञात इसमांनी जाधव आणि त्यांच्या साथीदारांवर हल्ला चढवला. चाकूचा धाक दाखवून जाधव यांच्याकडील पाच लाख रुपयांची रोख रक्कम, सोन्याची चेन, अंगठी, मोबाई, घड्याळ आणि इतर साहित्यासह ११ लक्ष ६६ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.
याप्रकरणी राजेंद्र जाधव यांच्या तक्रारीवरून अनिल छन्नु भोसले, अभिसेन तोन भोसले, दीपक भीमराव चव्हाण, दिनकर चलबाबू भोसले आणि इतर ८ जणांविरोधात भादंवि कलम ३९४, ३९५, १२० ब भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गुप्त माहितीच्या आधारे शोध मोहीम राबविली. या मोहिमेदरमन सुजातसिंग मर्दानसिंग पवार (४६, मुक्ताईनगर) याला एका प्रवासी कारसह अटक करण्यात आली आहे.
टोळीने काढले डोके वर! -
- मध्यंतरी तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्या नेतृत्वात या टोळीचा बीमोड करण्यासाठी सर्च ऑपरेशन राबविण्यात आले होते. सिनेस्टाईल ऑपरेशन राबवून खामगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. त्यानंतर काही टोळींचे म्होरके भूमिगत झाले होते. आता कारवाई शिथिल होताच टोळीने पुन्हा डोके वर काढले आहे. नकली नाणी, कमी किमती वाहन, आजारपण आणि लहान मुलांच्या खेळणी विक्रीतून लोकांशी सलगी वाढवित त्यांची फसवणूक करण्याचा या टोळीचा फंडा आहे.