परतीचा प्रवासच ठरला त्यांच्या जीवनाचा अखेरचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 11:04 AM2021-08-21T11:04:05+5:302021-08-21T11:04:13+5:30

The return journey was the last journey of his life : कॅम्पच्या दिशेने होणारा परतीचा प्रवासच त्यांच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास ठरला.

The return journey was the last journey of his life | परतीचा प्रवासच ठरला त्यांच्या जीवनाचा अखेरचा प्रवास

परतीचा प्रवासच ठरला त्यांच्या जीवनाचा अखेरचा प्रवास

googlenewsNext

- मुकूंद पाठक/ बाजीराव वाघ
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेड राजा/दुसरबीड : ‘समृद्धी’च्या कामासाठी मजुरांना घेऊन दैनंदिन पद्धतीने टिप्पर निघाला... पावसाची रिपरिप सुरूच होती... आज असे काही अघटित घडेल याची कोणालाच खबर नव्हती... मजुरांना घेऊन टिप्पर चालक साईटवर गेला, पण पाऊस असल्याने काम बंद असल्याचे सांगण्यात आल्याने मजुरांचा पुन्हा कॅम्पकडे परतीचा प्रवास सुरू झाला... आपल्यापुढे मरण वाढून ठेवले आहे, याची कल्पना कोणालाच नव्हती. सुटी मिळाल्याने सर्वचजण आनंदी होते. आजचा दिवस कॅम्पवर मुलाबाळांसोबत घालवायचा, असे अनेकांच्या मनात असेल. पण... पुढे काळ टपून बसला होता... आणि वेळ देखील आली होती... एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं... १३ जणांचे संसार उघड्यावर आले. एकप्रकारे कॅम्पच्या दिशेने होणारा परतीचा प्रवासच त्यांच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास ठरला.
सिंदखेड राजा तालुक्यातील तढेगाव फाट्यावर समृद्धी महामार्गाच्या कामावरून परत येत असलेला मजुरांचा टिप्पर एका वाहनाला साईड देताना अरुंद रस्त्यावरून उलटल्याने अपघात होऊन १५ पैकी १३ मजुरांचा मृत्यू झाला, तर दोन जणांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी ११:३० च्या सुमारास घडला. त्यामुळे सिंदखेड राजातील तढेगाव येथील समृद्धी कॅम्पवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 
मध्य प्रदेशातील या कामावरील मजूर नेहमीप्रमाणे शुक्रवारी आपल्या कामावर सकाळीच गेले. पण पावसामुळे समृद्धी महामार्गावरील काम बंद ठेवण्यात आल्याचे या मजुरांना सांगण्यात आले
. त्यामुळे लोखंडी रॉड ठेवलेल्या टिप्परमध्ये बसून १५ मजुरांनी कॅम्पवर परतीचा मार्ग स्वीकारला. मात्र हा त्यांचा परतीचा प्रवास आयुष्याचा शेवटचा प्रवास असल्याची साधी कल्पनाही त्यांना नव्हती. दुसरबीडकडून तढेगाव कॅम्पकडच्या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ सी वरून वळल्यानंतर अवघ्या २०० फुटाच्या अंतरावर या टिप्परला अपघात होऊन तो उलटला. त्यामुळे त्यात बसलेले मजूर खाली दबले. त्यांच्या अंगावर लोखंडी रॉड व त्यावर टिप्पर असा हा विचित्र अपघात होता.


आक्रोष आणि असाहाय्यता...
हा अपघात कॅम्पपासून अवघ्या तीन ते चार कि.मी. अंतरावर झाला. अपघाताची माहिती मिळताच कॅम्पवरील मजूरही घटनास्थळाकडे धावले. परंतु अजस्त्र टिप्पर, तसेच लोखंडी रॉड पाहता, नेमके मदतकार्य कसे करायचे, असाच प्रश्न सर्वांना पडला होता. आपले आप्तस्वकीय याखाली दबले गेल्याची जाणीव होताच, तेथे आक्रोष सुरू झाला होता. मदत करण्याची इच्छा असूनही परिस्थितीमुळे असाहाय्यता निर्माण झाली होती. जमेल त्या पद्धतीने त्यांना वाचविण्याचे प्रयत्न स्थानिकांनी सुरू केले. लोखंडी रॉडखाली निपचीत पडलेले मजूर पाहून उपस्थितांचे काळीज हादरून गेले.

Web Title: The return journey was the last journey of his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.