परतीच्या पावसाचा फटका; हातातोंडाशी आलेला घास हिरावला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 01:44 PM2019-10-29T13:44:27+5:302019-10-29T13:44:32+5:30
परतीच्या पावसाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावत चालला आहे.
- ब्रम्हानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोयाबीन, ज्वारीसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीन व ज्वारीला तर हिरवेकच्च कोंब आलेले आहेत. परतीच्या पावसाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावत चालला आहे.
जिल्ह्यात सात लाख २९ हजार ८५८ हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी शेतकऱ्यांनी केली होती. यावर्षी सुरूवातीला पावसाचे चिन्ह चांगले असल्याने कृषी विभागाच्या नियोजनानूसार जिल्ह्यात १०३ टक्के पेरा झाला. गेल्या १५ दिवसांपासून सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे. परंतू परतीच्या पावसाने सोयाबीन काढणीला मोठा खोडा निर्माण केला आहे. ज्या ठिकाणी सोयाबीन सोंगणी झाली, त्यांनी शेतातच सुडी लावलेली आहे. परंतू या पावसामुळे सोयाबीन सुडीलाच फटका बसत आहे. सुडी लावलेल्या सोयाबीनला कोंब आल्याने त्याचे नुकसान होत आहे. तर शेतात उभ्या असलेल्या ज्वारी पिकासाठी सुद्धा हा पाऊस नुकसानकारक ठरत आहे. ज्वारीच्या कणसाला कोंब येत असल्याचे दिसून येत आहे. परतीच्या पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढतच असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
कपाशीचे बोंडही झाले खराब
जिल्ह्यात कपाशीचे सरासरी क्षेत्र १ लाख ९९ हजार २७३ हेक्टर आहे. त्यापैकी २ लाख १३ हजार १८७ हेक्टर क्षेत्रावर कपाशी पेरा झाले आहे. यावर्षी जिल्ह्यात नियोजित क्षेत्रापैकी १०७ टक्के कापूस लागवड आहे. परंतू परतीच्या पावसाने हे कापूस पीक धोक्यात सापडले आहे. सोयाबीन पाठोपाठ कपाशी पीक घेतले जाते. जिल्ह्यात कपाशी उत्पादक शेतकºयांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. परंतू अतिपावसाने कापासाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या शेतात असलेली कापासाची बोंडे खराब झालेली दिसून येत आहेत.
‘शेतकºयांना तातडीने मदत द्या’
परतीच्या पावसामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीन, ज्वारी, कपाशी उत्पादक शेतकरी संकटात आहे. काही शेतकºयांना शेतात लागलेली सोयाबीन सुडी काढूण आणणे अवघड झाले आहे. अनेकांच्या शेतात पाणी साचलेले असल्याने सोयाबीन सोंगता येत नाही. नुकसानग्रस्त शेतकºयांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी.
- नामदेवराव जाधव, शेतकरी नेते, शेतकरी संघटना.
नुकसानग्रस्त भागाचा सर्वे सुरू आहे
ज्या शेतकºयांची सोयाबीन अद्याप शेतात आहे, त्यांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. सोयाबीन व ज्वारी पिकाला मोड आलेले आहेत. कापूस पिकाचे काहीच ठिकाणी नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाज घेणे पूर्ण झाले असून, आता नुकसानग्रस्त भागात सर्वे करण्यात येत आहेत. पावसाने उघडीप दिल्यानंतर सर्वेला वेग येईल.
- नरेंद्र नाईक, जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, बुलडाणा.