जिल्हा शिक्षण, प्रशिक्षण संस्थेच्या वतीने स्वाध्याय उपक्रमाबाबत आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:34 AM2021-03-05T04:34:30+5:302021-03-05T04:34:30+5:30
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. विजयकुमार शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात झालेल्या या बैठकीला शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, ...
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. विजयकुमार शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात झालेल्या या बैठकीला शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, डॉ. रवी जाधव, शिक्षणाधिकारी सचिन जगताप, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता राजेश गवई, रवींद्र सोनुने, धम्मरत्न वायवळ, राजेंद्र अजगर, सुजाता भालेराव यांच्यासह सर्व विषय सहायक व समुपदेशक, जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षकांची उपस्थिती होती. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हाॅट्सॲप स्वाध्याय हा उपक्रम चार महिन्यांपासून सुरू आहे. जिल्ह्यातील एकूण ५ लाख २९ हजार ५२० पात्र विद्यार्थ्यांपैकी आजपर्यंत ४० हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या उपक्रमात नोंदणी होऊन ते स्वाध्याय सोडवत आहेत. व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून स्वाध्याय उपक्रमांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांचा आकडा समाधानकारक जरी असला तरी तो वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभागाच्यावतीने इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महाकरिअर पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती व विद्यार्थ्यांची नोंदणी याविषयी जिल्हा समुपदेशक अरविंद शिंगाडे यांनी सादरीकरण केले.
सभेचे नियोजन व तांत्रिक सहकार्य संतोष तेजनकर व विकास लोखंडे यांनी केले. आढावा बैठकीचे प्रास्ताविक राजेंद्र अजगर यांनी केले. अरविंद शिंगाडे यांनी सूत्रसंचालन केले, तर परेश पडोळकर यांनी आभार मानले.
विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवा : शिंदे
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. विजयकुमार शिंदे यांनी समारोपीय मार्गदर्शनात कोविडमुळे मुले शाळेत येऊ शकत नाहीत, त्यांच्या मूल्यमापनासाठी स्वाध्याय उपक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्वांनी गांभीर्याने विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी प्रयत्न करावे व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवावा असे प्रतिपादन केले. स्वाध्याय उपक्रमामध्ये विद्यार्थी नोंदणी व स्वाध्याय सोडविणे यासंदर्भात सादरीकरण देविदास गोसावी यांनी केले.