रिक्षाचालकांना मिळणार १५०० रुपयांचे अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:24 AM2021-06-03T04:24:42+5:302021-06-03T04:24:42+5:30
बुलडाणा : काेराेनाचा वाढताचा संसर्ग पाहता राज्यभरात निर्बंध कडक करण्यात आले हाेते़ त्यामुळे, राज्य शासनाच्या वतीने रिक्षाचालक, माेलकरणींसाठी ...
बुलडाणा : काेराेनाचा वाढताचा संसर्ग पाहता राज्यभरात निर्बंध कडक करण्यात आले हाेते़ त्यामुळे, राज्य शासनाच्या वतीने रिक्षाचालक, माेलकरणींसाठी पॅकेज जाहीर करण्यात आले हाेते़ रिक्षाचालकांना १५०० रुपये अनुदान देण्याची घाेषणा राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली हाेती़ या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत असून परवानाधारक रिक्षाचालकांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे़
अर्ज पडताळणी करून चालकांच्या खात्यात मंजूर अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. याकरिता रिक्षाचालकांना संकेतस्थळावर ऑनलाइन पध्दतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. परवानाधारक रिक्षाचालकांना ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी त्यांचे आधारकार्ड मोबाइल क्रमांकाशी जोडणे आवश्यक आहे. या जोडणीची सुविधा आरटीओ कार्यालय, बुलडाणा येथे उपलब्ध केली आहे. तसेच परवानाधारक रिक्षाचालकांनी त्यांचे आधारकार्ड त्यांचा बँक खात्याशी जोडणी करणे आवश्यक आहे. ऑनलाइन प्रणालीवर अर्ज करताना आधारकार्डसोबत लिंक असलेल्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी क्रमांक प्राप्त झाल्यानंतर ऑनलाइन अर्जात त्याचा वाहक क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक, आधार क्रमाक नोंद करावा. अर्जदाराने ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर परिवहन कार्यालय अर्जातील नमूद तपशील कार्यालयातील अभिलेखाशी पडताळून सत्यता तपासल्यानंतर ऑनलाइन पध्दतीने अर्ज मंजूर करून अर्जदाराच्या बँक खात्यात १५०० रुपये शासनाकडून जमा करण्यात येणार आहेत. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन पध्दतीने होणार असल्याने कार्यालयात उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. तसेच सर्व परवानाधारक रिक्षाचालकांनी ऑनलाइन पध्दतीने सानुग्रह अनुदान मिळण्याकरिता अर्ज सादर करावेत, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दिपत्रकाद्वारे केले आहे.
परवाना नसलेले वंचित राहणार
जिल्ह्यात अनेक जण भाड्याने ऑटाे घेऊन चालवतात़ त्यांच्या नावाने ऑटाे नाही़ कडक निर्बंधांमुळे भाड्याने ऑटाे घेऊन चालवणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे़ अनेकांजवळ ऑटाे चालवण्याचा परवानाही नाही़ त्यामुळे, शासनाच्या मदतीपासून ते वंचित राहणार आहेत.
जिल्ह्यात परवानाधारक ऑटाेचालकांची संख्या १६४००
परवाना नसलेले चालक ४०००
मिळणारी मदत १५०० रुपये