गटविकास अधिका-याचे अधिकार काढले!
By Admin | Published: May 10, 2017 07:12 AM2017-05-10T07:12:00+5:302017-05-10T07:12:00+5:30
मलकापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक तायडे यांचे अधिकार काढण्याचा ठराव एकमताने मंजूर केला.
मलकापूर : ग्रामीण जनतेची कामे न करणे, विकासकामांना खीळ घालणे तसेच अधिनस्त कर्मचाऱ्यांवर कोणताही अंकुश न ठेवणे असा कारभार हाकण्याचा ठपका ठेवीत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक तायडे यांचे अधिकार काढण्याचा ठराव पं.स.च्या मासिक सभेत ८ मे रोजी सर्व पं.स.सदस्यांनी एकमताने मंजूर केला. या निर्णयामुळे पं.स.च्या वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
विकास कामांमध्ये हलगर्जी करणे अधिनस्त कर्मचाऱ्यांकडून कामे करुन घेण्यास कमी पडणे, दोन वर्षांपासून मंजुरात प्राप्त रोहयोतील विहिरीचे कामे न सुरु करणे, ग्रामीण भागातील नागरिकांच्या कामांना दिरंगाई करणे यासारखे आरोप करीत पं.स.सदस्यांनी गटविकास अधिकारी अशोक तायडे यांचे अधिकार काढून घेण्यात यावे, असा ठराव पं.स.च्या मासिक सभेत मांडला.
सभेत मांडण्यात आलेला ठराव सभापती संगीता तायडे, सदस्य अर्चना काजळे, आनंदा शिरसाट, सुरेशचंद्र पाटील व बबन तायडे यांच्या उपस्थित सर्वानुमते हा ठराव पारित केला. सहा सदस्य संख्या असलेल्या पं.स.मध्ये ४ सदस्य भाजपाचे तर २ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असून, सत्ताधारी भाजपासह राष्ट्रवादीच्या सदस्यांनीसुद्धा सदर ठरावाला मंजुरी दिली, हे विशेष!