तेलाच्या मागणीत वाढ, तेल पिकांकडे शेतकऱ्यांची पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:28 AM2021-01-02T04:28:25+5:302021-01-02T04:28:25+5:30

जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र १ लाख ७८ हजार ४३६ हेक्टर आहे. त्यापैकी यंदा २ लाख १३ हजार ३६१ ...

Rising demand for oil, farmers turn their backs on oil crops! | तेलाच्या मागणीत वाढ, तेल पिकांकडे शेतकऱ्यांची पाठ!

तेलाच्या मागणीत वाढ, तेल पिकांकडे शेतकऱ्यांची पाठ!

Next

जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र १ लाख ७८ हजार ४३६ हेक्टर आहे. त्यापैकी यंदा २ लाख १३ हजार ३६१ म्हणजे १२० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. परंतु यामध्ये गळीतधान्याचे प्रमाण हे अत्यंत कमी दिसून येत आहे. पूर्वी रब्बी हंगामामध्ये जवळपास ६० टक्के क्षेत्रावर सूर्यफूल, जवस, करडी, मोहरी, तीळ आदी गळीतधान्याचे पीक घेतले जात होते. मात्र आता या पिकाला शेतकऱ्यांची पसंती दिसून येत नाही. तेलाच्या मागणीत वाढ होत असताना, शेतकऱ्यांनी तेलपीक घेण्याकडे दुर्लक्ष केले आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी हे गहू व हरभरा हीच पेरणी घेत आहेत. खरीप हंगामात तेवढे सोयाबीनचे पीक घेण्यात येत आहे. मात्र त्यातही गेल्या चार वर्षांपासून शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आला आहे. सोयाबीन पीकही परवडत नसल्याने पिकात फेरबदल करण्याच्या विचारात शेतकरी आहेत.

जवस हद्दपार; करडी, सूर्यफूल, मोहरीचे प्रमाणही घटले

जिल्ह्यात करडी, सूर्यफूल, मोहरी या तेलपीक पेऱ्यात खूप मोठा फरक पडला आहे. जिल्ह्यातील तेल पिकांचा आढावा घेतला असता जवस हे तेलपीक जिल्ह्यातून हद्दपार झाल्याचे दिसून येत आहे. तर सूर्यफूल व मोहरीचे पीकही अत्यंत कमी झाले आहे. या वर्षी सूर्यफुलाची पेरणी अवघी तीन हेक्टर क्षेत्रावरच झाली आहे. जिल्ह्यात गळीतधान्याचे सरासरी क्षेत्र ५५२ हेक्टर आहे. त्यापैकी केवळ ३२ टक्के म्हणजे १९२ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झालेली आहे.

तेल पिकांपैकी जिल्ह्यात सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. शेतकऱ्यांनी सूर्यफूल, करडी, तीळ यासारखे गळीतधान्याचे पीक घेतले पाहिजे. शेतकऱ्यांनी दरवेळेस तेच ते पीक घेऊ नये. उत्पादन वाढविण्यासाठी आणि जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी पिकांमध्ये फेरपालट हा महत्त्वाचा आहे. पूर्वी गळीतधान्य मोठ्या प्रमाणावर घेतले जात होते.

- नरेंद्र नाईक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

मी सध्या मोहरी हे तेलपीक घेतले आहे. परंतु तेलपीक घेणे परवडत नाही. पाऊसही बेभरवशाचा असल्याने गळीतधान्याच्या उत्पादनात नुकसानच सहन करावे लागते. त्यात वेगवेगळ्या कीड व रोगांचा प्रादुर्भाव पाहता शेतकरी सूर्यफूल, करडी, तीळ, जवस यांसारख्या पिकांकडे वळत नाहीत. त्यामुळे अलीकडील काळामध्ये तेल पिकामध्ये मोठी घट दिसून येत आहे.

- तनशिराम मानघाले, शेतकरी

Web Title: Rising demand for oil, farmers turn their backs on oil crops!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.