डिझेलचे दर वाढल्याने शेती मशागत महागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:32 AM2021-03-06T04:32:46+5:302021-03-06T04:32:46+5:30
धामणगांव परिसरात शेतात नांगरणीसह इतर शेती मशागतीची कामे सुरू झाली आहेत. दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली ...
धामणगांव परिसरात शेतात नांगरणीसह इतर शेती मशागतीची कामे सुरू झाली आहेत. दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. पेट्रोल, डिझेलच्या सततच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टरच्या साह्याने करावयाची मशागत महागली आहे. ट्रॅक्टर मालकांनी शेती मशागतीचे हे दर वाढविले आहेत. सध्या शेतात तूर, हरभरा, गहू काढण्याचा हंगाम सुरू आहे. अंदाजे १२० ते १३० रुपये एका कट्या मागे शेतकऱ्यांना द्यावे लागत आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरला ८०० ते ९०० रुपये मोजावे लागत आहेत. गॅसची भाव झाल्याने महिलांमधून ओरड होताना दिसत आहे. पूर्वीच्या काळात पांरपरिक पध्दतीने बैलजोडीने शेतकरी शेताची मशागत करीत होते. परंतु आता आधुनिक युगात यंत्र आल्याने शेतीची कामे ट्रॅक्टर मळणीयंत्र, रोटावेटर, हार्वेस्टर याद्वारे होत आहे. या यंत्रांना पेट्रोल व डिझेलची गरज असते. परंतु आता डिझेल व पेट्रोलचे दर वाढतच आहेत. त्यामुळे शेती मशागतीच्या कामासाठी वापरले जाणारे ट्रॅक्टर नांगरणीसाठी तासाला सातशे ते आठशे रुपये घेत आहेत. ट्रॅक्टर, मळणी यंत्र, हार्वेस्टर, जेसीबी यांचेही दर वाढले आहेत. सध्या परिसरात ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरणी केली जात आहे.