गहू,भाजीपाला पिकांवर रोगांच्या आक्रमणाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 05:19 PM2020-12-15T17:19:37+5:302020-12-15T17:19:50+5:30
Agriculture News पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलक्या पावसामुळे गहू, हरभरा पिकांच्या कोवळ्या रोपांना फटका बसत आहे. तसेच तुरीवरही अळ्यांचे आक्रमण वाढणार असून पालेभाज्यांचे पीक नष्ट होत आहे. पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.
खरिपातील सोयाबीनला अतिपावसाचा फटका तसेच कापसाला बोंडअळीने गिळंकृत केले. खर्चाचा विचार करता खरीप हंगाम तोट्यात गेला. शेतकऱ्यांनी आता रब्बी हंगामात गहू, हरभऱ्याची पेरणी केली आहे. त्याची रोपे जमिनीवर आली. त्यातच ढगाळ वातावरणामुळे या पिकांवर किडींचा हल्ला वाढत आहे. तर पावसाने मूळकुज रोगामुळे पीक करपण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. भाजीपाला पिकावरही मोठ्या प्रमाणात किडींचा हल्ला होणार आहे. त्यासाठी फवारणीचा खर्च वाढणार आहे.
शेतकऱ्यांनी घाबरून न जाता कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार उपाययाेजना कराव्यात, ते केल्यास पिकांवरील आक्रमण रोखण्यास मदत होईल.
- जी.बी.गिरी,
तालुका कृषी अधिकारी,
खामगाव.