रस्ते विकासाने घेतला मेहकरातील पुरातन वृक्षाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:36 AM2021-03-27T04:36:14+5:302021-03-27T04:36:14+5:30
शहरामध्ये विलंबाने का होईना पण पालखी मार्गाचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या विस्तार कामासाठी शहरातील अत्यंत जुने व ...
शहरामध्ये विलंबाने का होईना पण पालखी मार्गाचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या विस्तार कामासाठी शहरातील अत्यंत जुने व वैशिष्ट्यपूर्ण असलेले चिंचेचे झाड तोडण्यात आले. नागरिकांनी या पुरातन वृक्षतोडीबद्दल समाज माध्यमावर माहिती टाकल्यानंतर अनेकांनी दुःखद प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिकेजवळ पुरातन चिंचेचे झाड आहे. किंबहुना हा परिसरच चिंच परिसर म्हणून ओळखला जातो. चिंचेचे हे वृक्ष किती जुने आहे याबद्दल कोणालाच निश्चित माहिती नाही. या वृक्षाला शहरांमध्ये एक अनन्यसाधारण महत्त्व होते. या परिसरातील भागाची ओळख सांगण्यासाठी चिंचेचे झाड ही एक फार मोठी ओळख होती. परिसरात असलेला व्यक्ती आपले ठिकाण सांगण्यासाठी या वृक्षाचे नाव घेत असल्यामुळे समोरच्याला ती व्यक्ती गाठणे सोपे जायचे. हे वृक्ष असलेले ठिकाण म्हणजे लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच परिचित. मेहकर-बुलडाणा, मेहकर-औरंगाबाद या मार्गाने जाणारी वाहने या वृक्षाच्या सावलीतून जात होती. अत्यंत पुरातन असलेल्या या वृक्षाने आपली स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. मागील काही वर्षांपासून शेगाव-पंढरपूर या पालखी महामार्ग अंतर्गत शहरातून सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. या रस्त्याच्या विस्तारासाठी आज हा वृक्ष कापण्यात आला. अनेक नागरिक या वेळी दुःखद भावनेने या वृक्षाकडे पाहत होते.
काही नागरिकांनी या वृक्षाच्या तोडीबद्दलची माहिती समाजमाध्यमावर टाकल्यानंतर अनेकांनी आपल्या दुःखद भावना व्यक्त केल्या. हे चिंचेचे झाड तोडल्यानंतर आम्हाला भकास वाटत असल्याच्या, काहींनी हे वृक्ष सदैव स्मरणात राहील, तर विकास करायचा म्हटलं, की काही गोष्टींचा विनाश अटळ असतो, अशा भावना व्यक्त केल्या आहेत.