खामगावातील रस्त्यांचे पॅचिंग निकृष्ट दर्जाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 03:02 PM2020-02-03T15:02:07+5:302020-02-03T15:02:17+5:30
रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्या जात असल्याची ओरड सामान्य नागरिकांची आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास गत आठवड्यात सुरूवात करण्यात आली. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी लोटत नाही, तोच खड्डे उखडत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्या जात असल्याची ओरड सामान्य नागरिकांची आहे.
खामगाव शहरातील रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात जागो जागी खड्डे पडले. हे खड्डे बुजविण्यासाठी नगर पालिका प्रशासनामार्फत कंत्राट देण्यात आला. मात्र, कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे साहित्या वापरल्या जात असल्याने असल्याने अवघ्या तीन दिवसांतच शहरातील काँग्रेस भवन रस्ता, नॅशनल हायस्कूल रस्ता, फरशी, शहर पोलिस स्टेशन रोडवर टाकण्यात डांबरीकरण उखडले आहे. गत महिन्यात शेगाव नाका ते डिपीपर्यंतच्या आणि चांदमारीतील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले होते. त्यामुळे संबंधित काम करणाºया कंत्राटदारास पाच हजार रूपयांचा दंडही पालिकेने ठोठावला होता. यामुळे कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाच्या कामावर शिक्कामोर्तब झाला होता. दरम्यान, गत आठवड्यात शहरातील बुजविण्यात आलेल्या खड्डयांची तांत्रिक तपासणी करण्याची मागणी जोर धरत आहे.
नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष!
शहरातील रस्त्यावरील खड्डे अतिशय निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून बुजविल्या जात आहेत. याबाबत काही नागरिकांकडून तक्रारही करण्यात येत आहे. मात्र, पालिकेचे अधिकारी याकडे जाणिवपूर्वक डोळेझाक करीत असल्याची चर्चा आहे. मार्च महिन्यांपूर्वी डागडुजीचे बिलं काढण्यासाठीच खड्डेबुजविण्याचा फार्स केल्या जात असल्याचा आरोप यानिमित्ताने होत आहे.
शहरातील काही रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी प्रारंभ करण्यात आला आहे. खड्डे बुजविण्यासाठी योग्य त्या पध्दतीत सिलकोट टाकण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदाराला दिल्या जातील. त्यांच्या कामाच्या दर्जाकडेही लक्ष दिले जाईल.
- शुभम कुळकर्णी
कनिष्ठ अभियंता, बांधकाम विभाग, नगर परिषद, खामगाव.