रस्त्याचे काम निकृष्ट!
By admin | Published: July 2, 2017 09:09 AM2017-07-02T09:09:47+5:302017-07-02T09:09:47+5:30
अडगाव राजा ते उमरद नवीन रस्त्याचे डांबरीकरण उखडले!
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेड राजा : तालुक्यात आमदार आदर्श ग्राम असलेल्या आडगाव राजा ते उमरद या नवीन डांबरीकरण रस्त्यावर बाजूला असलेल्या नाल्यामधील काळी माती जेसीबी मशीनच्या सहाय्याने टाकून निकृष्ट काम करण्यात आले. त्यामुळे या रस्त्यावर पावसाळ्यात चिखल निर्माण झाल्याने वाहनचालक त्रस्त होत आहेत.
आमदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत आडगाव राजाला जोडणारे सर्व रस्ते डांबरीकरण व्हावे, यासाठी आ.डॉ. शशीकांत खेडेकर यांनी आडगाव राजा ते उमरद व आडगाव राजा ते सावखेड तेजन या रस्त्यावर नवीन डांबरीकरण मंजूर केले. या रस्त्याचे काम करण्यात आले असून, यापैकी दोन्ही रस्त्याच्या कामात अनियमितता आढळून आली आहे. डांबरीकरण लगेच फुटायला सुरुवात झाली असून, अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम ठेकेदाराने केले आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी व इंजिनिअर कंत्राटदाराला पाठीशी घालत आहेत. नुकतेच दोन दिवसांपूर्वी आडगाव राजा ते उमरद रस्त्यावर डांबरीकरणाचे बाजूला पट्ट्यावर शासकीय कंत्राटदारांनी बाजूलाच असलेल्या नालीमधील काळी माती जेसीबी मशीनच्या सहाय्याने उकरून टाकली आहे. वास्तविक पाहता, या रस्त्यावर डांबरीकरणाच्या बाजूला पट्ट्यावर मुरुम टाकायला पाहिजे होता; परंतु तसे न करता थातूरमातूर मुरूम टाकून शासकीय कंत्राटदाराने या रस्त्याला चूना लावण्याचे काम केले आहे. कंत्राटदाराने डांबरीकरणही निकृष्ट दर्जाचे केले आहे. आमदार आदर्श ग्रामच्या रस्त्याच्या कामाचे जर असे हाल असतील, तर इतर रस्त्याच्या कामाचे काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. पावसाळ्यात या काळ्या मातीचा चिखल होत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.