जमावबंदीतही खामगाव शहरातील रस्ते गजबजलेलेच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 11:46 AM2021-02-23T11:46:54+5:302021-02-23T11:47:01+5:30
Khamgaon News सार्वजनिक ठिकाणी फिरताना नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन होत नसल्याने, शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील बाजारपेठा, उद्याने यांसह सार्वजनिक ठिकाणी फिरताना नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही.
मास्कचाही आता साऱ्यांनाच विसर पडला आहे. मला कोरोना होत नाही, अशा प्रकारची बेफिकिरी नागरिकांत वाढत असल्याचे दिसून येते. शहरात दुचाकी वाहनधारक विनामास्कच रपेट मारताना दिसतात. त्यामुळे कोरोनाचे संकट अधिक गडद होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
२८ फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीचा आदेश आहे. ७ वाजता बाजारपेठेतील दुकाने बंद होतात. असे असतानाही रस्त्यावरील गजबज कमी होताना दिसून येत नाही. चौका-चौकात युवकांचे टोळके, विविध रस्त्यांवर नागरिक अनावश्यक फिरताना आढळून येतात. सामाजिक अंतराचेही पालन केले जात नाही. मास्कचाहीं वापर केला जात नाही. मागील ७२ तासांत जिल्ह्यात १,५७२ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली.
त्यापैकी तब्बल ३०१ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. नवीन कोविडबाधितांची भर पडल्याने जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आता १६ हजार १४६ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात १८७ जणांचा कारोनाने मृत्यू झाला आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना, नागरिक बिनधास्त दिसून येत आहेत.