दुचाकीस्वारांना लुटणारा मिथून पोलिसांच्या ताब्यात, दोन आरोपी फरार
By संदीप वानखेडे | Published: January 22, 2024 03:36 PM2024-01-22T15:36:41+5:302024-01-22T15:37:19+5:30
डाेणगाव पाेलिसांची कारवाई
डोणगांव : पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम आंध्रृड शिवारात समृद्धी महामार्गावर असणाऱ्या लोणीगवळी रोडवरील पुलावर दुचाकीस्वारांना लुटणाऱ्या मिथून मधुकर चव्हाण नामक गुंडास गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, डोणगांव ते लोणी गवळी रोडवर समृद्धी महामार्गाच्या पुलापुढे २१ जानेवारी रोजी रात्री ८:१५ वाजेच्या सुमारास महावीर शंकर दळवी (घाटबोरी) आणि त्यांचे मित्र विनोद निवृत्ती देशमुख (आंध्रृड) हे दोघे शेतीचे साहित्य घेऊन जात असताना मिथून मधुकर (२५, रा. पांगरखेडा, जि. वाशिम) व अन्य दोघांनी महावीर दळवी यांची दुचाकी अडवून त्यांच्या व विनोद देशमुख यांच्या गळ्याला चाकू लावला. तसेच खिशातील ७०० रुपये जबरीने काढून घ्यायला लागला.
यावेळी डोणगावचे ठाणेदार अमरनाथ नागरे यांना संपर्क साधला असता, त्यांनी गस्तीवर असणारे बीट जमादार सतीश मुळे, आनंद चोपडे, पवन गाभणे, पुंडलिक वाळले यांना तत्काळ घटनास्थळी रवाना केले. त्यामुळे गावकऱ्यांच्या सहाय्याने मिथूनला पकडून डोणगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र, तोपर्यंत अन्य दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. संबंधित आरोपीवर मेहकर आणि मालेगाव (जि. वाशिम) पोलिस स्टेशनमध्ये यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याने घडवून आणलेले गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोहेकॉ संजय घिके करीत आहेत.