भालगाव येथील शेतकऱ्याच्या घरावर दरोडा; ३़ ७० लाखांचा ऐवज लंपास, भालगाव येथील घटना
By संदीप वानखेडे | Published: September 9, 2023 05:54 PM2023-09-09T17:54:13+5:302023-09-09T17:54:24+5:30
भालगाव येथील शेतकरी गजानन माधव परिहार हे आई सुमनबाई, वडील माधव, पत्नी गीता, बहीण मालता परिहार यांच्यासह शेतात बांधलेल्या घरात वास्तव्यास आहेत.
चिखली (बुलढाणा) : तालुक्यातील भालगाव येथील एका घरावर सहा सशस्त्र दरोडेखोरांनी घरफोडी करून शस्त्राचा धाक दाखवीत ३ लाख ७० हजारांचा ऐवज जबरीने लंपास केला़ ही घटना ८ सप्टेंबरच्या रात्री साडेअकरा ते दीड वाजेच्या सुमारास सुमारास घडली. भालगाव येथील शेतकरी गजानन माधव परिहार हे आई सुमनबाई, वडील माधव, पत्नी गीता, बहीण मालता परिहार यांच्यासह शेतात बांधलेल्या घरात वास्तव्यास आहेत. त्यांच्या या घरात ८ सप्टेंबरच्या रात्री साडेअकरा वाजता तोंडाला रुमाल, अंगात रेनकोट व डोक्यात टोपी घातलेल्या ३५ ते ४० वर्षे वयोगटातील सहा सशस्त्र दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला.
अज्ञात चोरटे घरात प्रवेश केल्याचे समजताच गजानन परिहार यांच्या आईने आरडाओरड केल्याने घरातील सर्व सदस्य जागे झाले. मात्र, दरोडेखोरांनी परिहार यांच्या आई, वडील, पत्नी व बहिणीस चाकूचा धाक दाखवीत आवाज कराल तर मारून टाकू, अशी धमकी देत दमदाटी केली. दरम्यान, तिघांनी शस्त्राच्या धाकावर कुटुंबातील सर्वांवर पाळत ठेवण्यासह महिलांच्या अगांवरील मणी-मंगळसूत्र, कानातील बाळ्या, हातातील चांदीचे कडे आदी दागिने जबरीने काढून घेतले. तर इतर ३ दरोडेखोरांनी देवघरातील पत्र्याची पेटी फोडून त्यातील एक-एक तोळ्याच्या दोन सोन्याच्या एकदाण्या, एक तोळ्याची सोन्याची गहुपोत, एक तोळ्याचे सोन्याचे झुंबर, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असे एकूण ३ लाख १५ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिणे, तसेच एका पेटीतील रोख ३० हजार, लोखंडी कपाटातील ५ हजार असे रोख ३५ हजार आणि बेडरूमधील सॅमसंग कंपनीचा एक दहा हजारांचा टॅब, पाच-पाच हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल लंपास केले.
दाेन तास ठेवले कुटुंबीयांना ओलिस
या दरोडेखोरांनी तब्बल दोन तास सर्वांना ओलिस ठेवत घरात दहशत माजविली होती. दरम्यान, फारार होताना ज्या खोलीत सर्वांना डांबले होते त्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद केला होता. शिवाय कोणाशी संपर्क होऊ नये म्हणून मोबाइल देखील लंपास केल्याने पहाटे सव्वा सहा वाजेपर्यंत या कुटुंबास कोणतीही मदत मिळाली नाही. अथक प्रयत्नांनी तार टाकून घराबाहेरील कडी उघडत कुटुंबीयांनी यातून सुटका करून घेतल्यानंतर गावात याबाबत माहिती देऊन पोलिसांना पाचारण केले. या प्रकरणी दराेडेखाेरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.