सराफा व्यापा-याच्या घरावर दरोडा; 11 लाखांचे सोने पळवले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 06:34 PM2018-03-25T18:34:00+5:302018-03-25T18:34:00+5:30
माळवंडी येथील सराफा व्यापा-याच्या घरावर २५ मार्च रोजी पहाटे तीन वाजेच्या सात ते आठ बुरखाधारी व्यक्तींनी दरोडा टाकून एक पाव सोने, सात किलो चांदी व नगदी ३५ हजार रुपये लुटले.
बुलडाणा : तालुक्यातील माळवंडी येथील सराफा व्यापा-याच्या घरावर २५ मार्च रोजी पहाटे तीन वाजेच्या सात ते आठ बुरखाधारी व्यक्तींनी दरोडा टाकून एक पाव सोने, सात किलो चांदी व नगदी ३५ हजार रुपये लुटले. दरम्यान, यावेळी घरातील दोन महिला, एक मुलगी आणि दोन पुरुषांना काठी व सळईने बेदम मारहाण करण्यात आल्याने पाच जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बुलडाणा
येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
जखमीमध्ये सराफा व्यापारी राजू मधुकर कव्हाळकर (३६), त्याचे वडील मधुकर कव्हाळकर (६५), आई रत्नमाला कव्हाळकर, पत्नी वैशाली कव्हाळकर हे चार जण गंभीर जखमी असून १२ वर्षाची मुलगी ऋतिका या अल्पवयीन मुलीसही किरकोळ मार लागला आहे. दरोडेखोरांनी सराफा व्यापार्याच्या घराचा दरवाजा लोखंडी सळईने तोडून घरात प्रवेश करताच कुटुंबातील पाचही सदस्यांना काठीने बेदम
मारहाण केली. सोबतच घरातील महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने अक्षरश: ओरबाडून घेतले. त्यानंतर दरोडेखोरांनी घरातील लोखंडी कपाटाचा दरवाजा तोडून त्यातील सामाना अस्ताव्यस्त फेकत राजू कव्हाळकर याने त्यात ठेवलेले २५० ग्रॅम सोने, सात किलो चांदी व काही सोन्या-चांदीचे दागिने ठेवलेली बॅग आणि रोख ३५ हजार घेऊन घराच्या मागील दरवाजाच्याने पलायन केले.
अनपेक्षित घडलेल्या घटनेमुळे कव्हाळकर कुटुंब पुरते भेदरून गेले होते. त्यामुळे त्यांना कोणाला मदतीलाही बोलावता आले नाही. अंधारात दरोडेखोरांनी मागच्या दाराने पलायन केल्यानंतर कव्हाळकर कुटुंबाने मदतीसाठी आरडा-ओरड केली. दरम्यान, माळवंडीचे सरपंच दत्ता चव्हाण यांनी या घटनेची माहिती रायपूर पोलिस ठाण्याला दिली. त्यानंतर लगोलग रायपूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार जे. एन. सय्यद व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोवर दरोडेखोरांनी तेथून पलायन केले होते. राजू कव्हाळकर याचे बुलडाणा- धाड मार्गावर दुधा गावात सोन्या-चांदीचे दुकान आहे.
दरोडेखोरांनी त्याच्यावर पद्धतशीर पाळत ठेऊन हा दरोडा टाकल्याचा पोलिसांचा कयास आहे. राजू कव्हाळकर दररोज दुधा येथून सायंकाळी सहा वाजता दुकानातील सोने-चांदी व रोख रक्कम घेऊन घरी येत होता. त्याची दरोडेखोरांना कल्पना असावी. घटनेचे गांभीर्य पाहता अप्पर पोलिस अधीक्षक संदीप डोईफोडे, उपविभागीय पोलिस अधिकारी बी. बी. महामुनी व पोलिस कर्मचार्यानी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. दरम्यान, दरोडेखोरांच्या शोधासाठी रायपूर पोलिसांची दोन पथके आणि स्थानिक गुन्हे शाखेचे एक असे तीन पथके तैनात करण्यात आले असून सैलानी येथील काही संशयीत झोपड्यांची सध्या पोलिस झडती घेत आहेत. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. ठसे तज्ज्ञांना दरोडेखोरांचे ठसे मिळाले असून श्वान पथकानेही सैलानीच्या
दिनेशने दरोडेखोरांचा माग दाखवला. त्या आधारावर सध्या रायपूर पोलिस सैलानीमधील काही संशयीत झोपड्यांची झडती घेत आहेत.
पोलिसांची तीन पथके; दरोडेखोर जालन्याकडील!
दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके स्थापन करण्यात आली असून दोन रायपूर पोलिस ठाण्याची तर एक स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आहे. दरोडेखोरांच्या गुन्हा करण्याच्या पद्धतीचा माग घेऊन ही तीन पथके स्थापन करण्यात आली असून तीन ठिकाणी दरोडेखोरांच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत. दरोडेखोरांची मोड्स आॅपरेंटसी पाहता जालना जिल्ह्यातील ही
दरोडेखोरांची टोळी असावी, असा कयास उपविभागीय पोलिस अधिकारी बी. बी. महामुनी यांनी लोकमतशी बोलतना व्यक्त केला. सोबतच घटनास्थळी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांसही पाचारण करण्यात आले होते. दरोडेखोरांच्या मोडस आॅपरेंटसीवरून पोलिस गुन्ह्याच्या तपासाची दिशा ठरवत आहेत.
श्वानाने दाखवला सैलानीची दिशा
श्वानाने माळवंडीपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या एका शेतात दागिने ठेवलेली रिकामी बॅक आणि रिकाम्या डब्या दरोडेखोरांनी जेथे फेकून दिल्या तेथपर्यंत माग काठला. मात्र त्यापुढे श्वान पथकास दरोडेखोरांचा माग काढता आला नाही. दुसरीकडे घटनेचे गांभिर्य पाहता रायपूर पोलिसांनी सैलानी येथील काही संशयास्पद वाटणार्या झोपड्यांची झडती सुरू केली आहे.
माल निकालो!
दरोडेखोरांनी कव्हाळकर यांच्या घरता प्रवेश करताच कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण करण्यास सुरूवात करत ह्यमाल निकालो! माल निकालो!ह्ण अशी डायलॉगबाजीही केली असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकार्याने लोकमतशी बोलताना सांगितले. या दरोडेखोरांजवळ काठ्या, कोयता आणि लोखंडी सळई असल्याचेही जखमींनी सांगितले. या दरोडेखोरांनी तोंडावर मास्कही लावलेले
होते.