शिक्षकाच्या घरी दरोडा; १२ तोळे सोने लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 11:44 AM2021-02-07T11:44:06+5:302021-02-07T11:44:18+5:30
Robbery at Mehkar दरोड्यात १२ तोळे सोने, १८ हजार रुपये रोख व दोन मोबाईल दरोडेखोरांनी लंपास केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर: येथील बालाजीनगरमधील एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी पडलेल्या दरोड्यात १२ तोळे सोने, १८ हजार रुपये रोख व दोन मोबाईल दरोडेखोरांनी लंपास केले आहे. ६ फेब्रुवारी रोजी पहाटे हा दरोडा पडला. दरम्यान या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
शहरातील बालाजी नगरात सेवानिवृत्त शिक्षक वसंतराव राठोड राहतात. पहाटे ४ च्या सुमारास पाच ते सहा अज्ञात दरोडेखोरांनी घर फोडून आत प्रवेश केला व घरातील ६० वर्षीय मथुराबाई वसंत राठोड व अन्य कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. सोबतच त्यांच्याजवळील सोन्याची पोत, रोख पैसे, दोन मोबाईल दरोडेखोरांनी लंपास केले. यासोबतच ५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घराचे लोखंडी गेट तोडून अज्ञात दरोडेखोरानी एक दुचाकी वाहनही लंपास केले आहे. तसेच आणखी काही ठिकाणीही घरफोडीचा प्रयत्न चोरट्यांनी केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरोडेखोरानी घरातील कपाट फोडून त्यामधील किमती वस्तूही लंपास केल्या आहेत.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. ठाणेदार आत्माराम प्रधान हेही घटनास्थळी दाखल झाले होते. प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास मेहकर पोलीस करत आहेत.