रोहण्याची झेडपी ‘टॉप’ बनली; ५ वर्षांत विद्यार्थी संख्या वाढली
By अनिल गवई | Published: February 28, 2024 05:10 PM2024-02-28T17:10:00+5:302024-02-28T17:10:37+5:30
मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या प्रयत्नांनी शाळेच्या पटसंख्येत गत पाच वर्षांत वाढ झाली आहे.
खामगाव: अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांवर कॉन्व्हेंट संस्कृतीचा प्रभाव वाढत असतानाच, खामगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जिल्हा परिषद शाळेची ओढ वाढत असल्याचे दिसून येते. रोहण्याची झेडपी शाळा टॉप बनली असून सामूहिक प्रयत्नांतून शाळेचे रूपडे पालटले आहे. मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या प्रयत्नांनी शाळेच्या पटसंख्येत गत पाच वर्षांत वाढ झाली आहे.
खामगाव तालुक्यातील रोहणा येथे जिल्हा परिषदेची हायस्कूल आहे. या हायस्कूलची स्थापना २६ जानेवारी १९७२ रोजी झाली असून, सुरुवातीच्या काळात पंचक्रोशीत असलेल्या या एकमेव शाळेने अनेक विद्यार्थी घडविले. मध्यंतरी कॉन्व्हेंट संस्कृतीमुळे शाळेला उतरती कळा लागल्याचे शल्य शिक्षकांना आणि ग्रामस्थांना बोचत होते. गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि मुख्याध्यापक, शिक्षकांच्या सकारात्मक प्रयत्नातून गावातील अनेकांची रोल मॉडेल असलेल्या शाळेला आता पूवर्वत स्वरूप प्राप्त होत आहे. त्यामुळे परिसरातील कोन्टी, बोथा, नांद्री, काळेगाव, वर्णा, गोंधनापूर, निमकोहळा येथील विद्यार्थ्यांसह पालकांचाही या शाळेत प्रवेशासाठी ओढा वाढला आहे. गतवर्षी बोथा येथील ३७ तर नांद्री येथील १८ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी या शाळेला प्राधान्य दिले. वर्णा, कोन्टी, निमकोहळा, काळेगाव, पोरज येथील विद्यार्थ्यांचीही जिल्हा परिषद शाळेत प्रवेशासाठी धडपड सुरू असल्याचे चित्र दिसून येते.
शाळेत तालुक्यातील एकमेव प्रयोग केंद्र
खामगाव तालुक्यातील विज्ञानाचे एकमेव प्रयोग केंद्र रोहणा येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्येच आहे. शिवाय याच शाळेत तांत्रिक शिक्षण दिले जात असून या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांची पॉलिटेक्निक आणि शासकीय तंत्र निकेतनमध्ये निवड झाली आहे. काही विद्यार्थी मोठ्या पदावरही नोकरीला लागले आहेत.
सामूहिक प्रयत्नांतून रोहणा येथील जिल्हा परिषद हायस्कूलने कात टाकली आहे. जिल्हा परिषद प्रशासन, शाळेतील शिक्षकांच्या प्रयत्नातून तसेच पालकांच्या समुपदेशनातून शाळेच्या पटसंख्येत गत पाच वर्षांत सरासरी ६० ते ७० विद्यार्थ्यांची भर पडली आहे. - पुष्पा प्रमोद कोळी(मुख्याध्यापक, जि. प. हायस्कूल, रोहणा ता. खामगाव.)