रोहयोमध्ये जगण्याचे बळ!
By admin | Published: February 29, 2016 02:25 AM2016-02-29T02:25:06+5:302016-02-29T02:25:06+5:30
बुलडाणा जिल्हा नियोजन समिती सभागृहात आढावा बैठक.
बुलडाणा : समाजातील दीन- दुबळ्या घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना ही अशा घटकांना मजुरीच्या माध्यमातून समाजात ताठ मानेने जगण्याचे बळ देते. या योजनेत जनसामान्यांमध्ये जगण्याची ताकद निर्माण करण्याची क्षमता असून, योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना समितीचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी दिल्या. स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात २८ फेब्रुवारी रोजगार हमी योजनेची ची जिल्हा आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर समिती सदस्य आमदार शोभा फडणवीस, सुभाष देशमुख, संजय रायमुलकर, बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ, सहसचिव म. मु काज, रोहयोचे उपसचिव प्रमोद शिंदे, कक्ष अधिकारी शशिकांत गायकवाड आदी उपस्थित होते. राज्याचे नवनिर्माण करण्यासाठी रोहयोमध्ये आमूलाग्र बादल करण्यात येणार असल्याचे संकेत देत रावल म्हणाले की, या योजनेत लवचिकता आणून मोठय़ा प्रमाणावर मजुरांना तातडीने कामे उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नरत आहे. लवकरच महाराष्ट्र जनकल्याण स्वाभिमान योजना आणण्यात येणार आहे. ही योजना अत्यंत प्रभावीपणे राज्यातील बेरोजगार हातांना काम देऊन निर्माण कार्य करेल. ते म्हणाले की, भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने विहीर पुनर्भरणाची कामे रोहयोच्या माध्यमातून घेण्यात यावी. गोठा, तलावातील गाळ काढणे, फळबाग लागवड, शौचालय निर्मिती, शेत रस्ते, गावातील अंतर्गत रस्ते आदी कामे रोहयोतून घेता येतात. ती घ्यावी आणि रोजगार उपलब्ध करून द्यावा. मजुरांचे पगार देताना पगार हजेरीपत्रक दोन वेळा जर चुकल्यास संबंधित कर्मचार्याला निलंबित करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. मेहकर तहसीलदार यांनी स्व:खर्चातून गाळ काढण्याचे सुरू केलेले काम प्रशंसनीय असल्याचे ते म्हणाले. समितीला जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी माहिती दिली. बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, रोहयो उपजिल्हाधिकारी रमेश घेवंदे, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक एस. आर. मोरे, कार्यकारी अभियंता चंद्रशेखर शिखरे, जिल्हा कृषी अधीक्षक प्रमोद लहाळे, वरिष्ठ भूवैज्ञानिक प्रवीण कथने आदींसह विविध विभागांचे विभागप्रमुख, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.