बुलडाणा: १८ ते ४९ वयोगटातील मतदारांची भूमिका निर्णायक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 03:10 PM2019-10-14T15:10:35+5:302019-10-14T15:10:47+5:30
१८ ते ४९ वयोगटातील मतदार हे निर्णाय भूमिका बजावू शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे
बुलडाणा: लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीमध्येही जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात तरुण वर्ग प्रकर्षाने निवडणुकीच्या प्रचारात गुंतलेला असून या निवडणुकीत १८ ते ४९ वयोगटातील मतदार हे निर्णाय भूमिका बजावू शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्हतील एकूण मतदारांची संख्या पाहता ६८ टक्के मतदार हे उपरोक्त वयोगटातील आहेत.
त्यामुळे त्यांचा कल कोणत्या दिशेला झुकतो यावर सातही विधानसभा मतदार संघातील निवडणूक लढतीचे गणित अवलंबून आहे. नाही म्हणायला बुलडाण्याचा अपवाद वगळात उर्वरित सहा विधानसभा मतदारसंघात दुरंगी, तिरंगी लढती होत आहे. बुलडाण्यात चौरंगी लढत होत आहे. त्या पृष्ठभूमीवर १८ ते ४९ वयोगटातील मतदार निर्णाय भूमिकेत राहू शकतात. प्रामुख्याने हा वयोगटत निवडणुकीच्या प्रचार प्रक्रियेत सक्रीय असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात ५१ हजार ४१९ मतदार हे १८ ते १९ वयोगटातील आहेत. तर ३० मधील मतदारांची संख्या ही चार लाख ३४ हजार २५ असून ४० मधील मतदारांची संख्या चार लाख ८२ हजार ९७६ असून ५० मधील मतदारांची संख्या ही चार लाख १६ हजार ७२३ आहे. जिल्ह्यात बेरोजगारी, सिंचन, आरोग्यासह पाणीप्रश्न मोठा आहे. या वयोगटाशी निगडीत या समस्या आहेत. त्यामुळे या वयोगटातील मतदारांची भूमिका विधानसभा निवडणुकीत निर्णायक ठरू शकते. १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या सातही विधानसभा मतदारसंघात सरासरी सात हजारांच्या आसपास आहे तर ३० मधील मतदार हे सरासरी ६० हजार तर ४० वयोगटातील मतदारांची संख्या सातही मतदारसंघात ही ६५ हजरांच्या घरात असून ५० वयोगटातील मतदारांची संख्या ही सरासी ५९ हजारांच्या घरात आहे. त्यामुळे या वयोगटातील मतदार निर्णायक भूमिकेत राहू शकतो.
१५ हजार मतदार प्रथमच करणार मतदान
विधानसभा निवडणुकीमध्ये १५ हजार ७८९ मतदार प्रथमच मतदान करणार आहेत. यात सर्वाधिक चार हजार १५३ मतदार हे जळगाव जामोद, तीन हजार ४११ मतदार हे मेहकर, १८२० मतदार सिंदखेड राजा, १७०९ मतदार खामगावमध्ये, चिखलीत १९४४, बुलडाण्यात १३८८ आणि मलकापूरमध्ये १३६४ मतदारांचा समावेश आहे. प्रथमच हे युवा मतदान करणार असल्याने त्यांच्यामध्ये मोठा उत्साह असल्याचे दिसून येत आहे.