पीक कर्जासाठी शेतकऱ्यांच्या बँकेत फेऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:22 AM2021-07-03T04:22:28+5:302021-07-03T04:22:28+5:30
अंढेरा : खरीप हंगामास सुरुवात हाेऊन महिना लाेटला असला तरी अनेक शेतकऱ्यांना अजूनही पीक कर्ज मिळालेले नाही़ त्यातच अंढेरा ...
अंढेरा : खरीप हंगामास सुरुवात हाेऊन महिना लाेटला असला तरी अनेक शेतकऱ्यांना अजूनही पीक कर्ज मिळालेले नाही़ त्यातच अंढेरा येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी सुटीवर गेल्याने शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकेत फेऱ्या माराव्या लागत आहेत़ याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे़
विदर्भ कोकण ग्रामीण बँकेची शाखा अंढेरा येथे असून या शाखेअंतर्गत सेवानगर, पिप्री आंधळे, मेंडगाव, बायगाव, सावखेड नागरे, शिवणी आरमाळ हे गावे येतात़ सध्या पेरणीचे दिवस सुरू असताना सगळीकडे पीक कर्ज वाटप सुरू आहे़ अंढेरा येथे मात्र येथील शाखेचे व्यवस्थापक हे गेल्या पंधरा दिवसांपासून सुटी असल्याने पीक कर्ज वाटप रखडलेले आहे़ विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना नव्याने पीक कर्ज वाटपाचे अधिकार मिळाले आहेत़ शाखा व्यवस्थापक गौरव जगताप सुटीवर असल्याने शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकेत फेऱ्या माराव्या लागत असल्याचे चित्र आहे़ नव्याने पीक कर्ज मागणीसाठी या भागातील शेतकऱ्यांनी देऊळगाव मही येथील बँकेकडे मागणी केली असता तुमचे कार्यक्षेत्र या बँकेकडे येत नसल्याचे कारण सांगण्यात आले.
अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
मृग नक्षत्रात पडलेल्या पावसाच्या बळावर अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली हाेती़ त्यानंतर दहा ते १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे़ तसेच अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या खाेळंबल्या आहेत़ पीक कर्ज मिळेल या आशेवर शेतकऱ्यांनी उसनवारी करून पेरणी केली आहे़ मात्र, महिना लाेटल्यानंतरही शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्याचे चित्र आहे़ याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे़ दरम्यान, याविषयी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांच्याशी संपर्क केला असता अंढेरा येथे लवकरच पर्यायी शाखा व्यवस्थापक पाठवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले़