‘लॉकडाउन’ काळात १० लाख रुपयांची दारू जप्त; ५७ आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 05:34 PM2020-04-22T17:34:03+5:302020-04-22T17:34:24+5:30
‘लॉकडाउन’ लागू झाल्यापासून २१ एप्रिलपर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे.
बुलडाणा : ‘लॉकडाउन’ कालावधीत मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश असताना या आदेशाचे उल्लंघन करत दारूची अवैध विक्री करणाºया ५७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून मुद्देमालासह ९ लाख ७१ हजार ५५१ रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. ‘लॉकडाउन’ लागू झाल्यापासून २१ एप्रिलपर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पृष्ठभूमीवर मद्यविक्री, निर्मिती तथा विक्रीवर राज्य शासनामार्फत निर्बंध घालण्यात आले होते. या नियमाचे उल्लंघन करणाºयांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूमन चंद्रा, राज्य उत्पादन शुल्क नागपूर विभागाचे उप आयुक्त यांनी दिल्या होत्या. त्याअनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचेबुलडाणा जिल्हा अधीक्षक बी. व्ही पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली लॉकडाउन कालावधीत दारूची अवैध विक्री करणाºयांविरोधात कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यातील भिलवाडा, देऊळघाट, डोंगरखंडाळ‘, सुंदरखेड, डोंगरशेवली, अमडापूर, पेठ, अंबाशी, शिरपूर, मेहकर फाटा, खरमोळा, लाडनापूर, खिरोडा, नागापूर, किन्ही महादेव, पारखेड, शेलुडी, खामगाव, चांदई, कोलारा, शेळगाव आटोळ, सावखेडन, पळसखेड दौलत, देऊळगाव घुबे, गायखेड, हरणखेड, कुºहा गोतमारा, शेलापूर, बोराखेडी, धाड-करडी, रनथम, देवधाबा आदी शिवार व गावात ही कारवाई झाली.
या कारवाईत खामगाव व चिखलीचे निरीक्षक जी. आर. गावंडे, बुलडाणा येथील निरीक्षक डी. आर. शेवाळे, भरारी पथकाचे एस. डी. चव्हाण, ए. आर. आडळकर, शेगावचे दुय्यम निरीक्षक ए. आर. आडळकर, खामगावचे दुय्यम निरीक्षक र. ना. गावंडे, एन. के. मावळे, बुलडाणा व मेहकरचे दुय्यम निरीक्षक वा. रा. वराडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. ‘लॉकडाउन’ लागू झाल्यापासून २१ एप्रिलपर्यंत झालेल्या या कारवाई तब्बल ५७ आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून ९ लाख ७१ हजार ५५१ रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.