जलसंवर्धनाच्या ‘बुलडाणा पॅटर्न’मुळे १०० कोटींची बचत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 04:59 PM2020-10-26T16:59:26+5:302020-10-26T16:59:35+5:30
Buldhana, National Highway राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या अमरावती ते मुक्ताईनगर दरम्यान होणाऱ्या कामातही हा पॅटर्न वापरण्यात येणार आहे.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जलसंवर्धनाच्या बुलडाणा पॅटर्नमुळे १०० कोटी रुपयांची राज्य शासनाची बचत झाली असून जिल्ह्यातील ६७ तलाव व नदी नाल्यांचे खोलीकरण झाले आहे. दरम्यान, आता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या अमरावती ते मुक्ताईनगर दरम्यान होणाऱ्या कामातही हा पॅटर्न वापरण्यात येणार आहे.
बुलडाणा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाची कामे करताना लागणारा मुरूम व माती ही जिल्ह्यातील ६७ तलाव व नदी, नाल्यांचे खोलीकरण करून काढण्यात आला आहे. जवळपास ६५ लाख घनमीटर एवढा मुरूम व माती राष्ट्रीय महामार्गाच्या जिल्ह्यातील कामात यातून वापरण्यात आली आहे. परिणामी बुलडाणा जिल्ह्यात ६,५५९ टीसीएम पाण्याचा साठा झाला. तसचे दोन वर्षे पडलेला चांगला पाऊस तलावांचे झालेले खोलीकरण यामुळे गेल्या वर्षी जिल्ह्याची भूजल पातळी ही ३.७६ मिटरने वाढण्यास मदत झाली. बुलडाणा जिल्ह्यात २०१६ पासून प्रामुख्याने रस्त्यांच्या कामात नदी, नाल्यांचे तथा तलावांचे खोलीकरण करून त्यातील मुरूम व माती वापरण्यात येत आहे. त्यामुळे गौणखनीजापोटी द्यावे लागणारे शुल्कही वाचण्यास मदत झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, या पॅटर्नवर आता निती आयोग राष्ट्रीयस्तरावरील धोरण ठरवत आहे.
एनएच ६ मध्येही होणार वापर
अमरावती ते मुक्ताईनगर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या कामामध्येही बुलडाणा पॅटर्नचा वापर होणार आहे. बाळापूर ते मलकापूर नजीकच्या चिखली पर्यंतच्या पट्ट्यास त्यात प्राधान्य देण्यात आले आहे. यातही नदी, नाल्यांचे खोलीकरण करून त्यातून निघणारा मुरूम हा या रस्त्याच्या कामात वापरण्यात येणार आहे. महामार्गाची रुंदी अधिक असल्याने मुरूम अधीक लागेल.
बारा रस्त्यांसाठी वापरला मुरूम
बुलडाणा पॅटर्नअंर्गत १३६ ठिकाणाहून हा मुरूम काढण्यात आला असून तो १२ रस्त्यांच्या कामामध्ये वापरण्यात आला. यामध्ये अंजिठा-बुलडाणा, खामगाव-चिखली, चिखली-ते बेराळा, बेराळा ते जालना, खामगाव-मेहकर, खामगाव-शेगाव, नांदुरा-जळगाव जामोद यासह अन्य रस्त्यांच्या कामात हा मुरूम वापरण्यात आला आहे. बुलडाणा पॅटर्न व वर्धा-नागपूर परिसरातील तामसवाडा पॅनर्ट आगामी कालात जलसंर्धनाच्या कामासाठी उपयुक्त असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.