खामगावनजीक ट्रकमधून १३ लाख रुपयांची औषधे लंपास; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 03:17 PM2020-02-25T15:17:05+5:302020-02-25T15:17:10+5:30
ट्रकमधून अज्ञात चोरट्यांनी १३ लाख रूपयाच्या किंमतीचे ५९ बॉक्स लंपास केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : गुजरात येथून नागपूरकडे औषधींचे बॉक्स घेवून जाणाऱ्या आयशर ट्रकमधून अज्ञात चोरट्यांनी १३ लाख रूपयाच्या किंमतीचे ५९ बॉक्स लंपास केला. ही घटना अकोला रोडवरील राजस्थानी ढाब्यावर घडली.
आयशर कंपनीचा ट्रक क्रमांक एमएच ०७ सी ६९९६ चा चालक विजय शिवाजी लोखंडे (३२) रा. औरंगाबाद हा गुजरात येथून लुपिन कंपनीच्या औषधाचे २४६ बॉक्स घेवून नागपूरकडे जात होता. दरम्यान खामगाव अकोला मार्गावरील भवानी पेट्रोलपंपासमोरील बाबा रामदेव राजस्थानी पेट्रोलपंपावर जेवणासाठी थांबला. दरम्यान अज्ञात चोरट्याने सदर आयशर ट्रकच्या पाठीमागील दरवाज्याचे कुलूप तोडून त्यातील ५९ बॉक्स (किंमत १३ लाख ७१ हजार ६६७ रू.) लंपास केले. यावेळी जेवण करून चालक विजय लोखंडे हा नागपूर येथे पोहोचला.
दरम्यान नागपूर येथे कंपनीत ट्रक इन करत असतांना त्यास मागील बाजूचे कुलूप लंपास झाल्याचे दिसून आले. यावेळी त्याने ट्रकमध्ये पाहणी केली असता त्याला औषधाचे ५९ बॉक्स लंपास झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी त्याने खामगाव ग्रामीण पोस्टेला येवून अज्ञात चोरट्याने औषधीचे बॉक्स लंपास केल्याची तक्रार दिली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द कलम ३७९ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.
(प्रतिनिधी)