कारच्या चाॅईस नंबरसाठी मोजले ५० हजार रुपये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 11:52 AM2021-06-26T11:52:03+5:302021-06-26T11:52:08+5:30
RTO News : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने १०३ वाहनांना चॉईसनंबर देण्यात आले.
- योगेश देऊळकार
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : गत १ ते २४ जून या कालावधीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने १०३ वाहनांना चॉईसनंबर देण्यात आले. या माध्यमातून १० लाख ४४ हजारांचा महसूल जमा झाला आहे. कारसाठी सर्वाधिक ५० हजार तर दुचाकीसाठी १५ हजारापर्यंतचा खर्च वाहनधारकांनी केला आहे.
आकर्षक नंबर आणि ग्राहकांच्या मागणीनुसार दिल्या जाणाऱ्या चॉईस नंबरसाठी परिवहन विभाग ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क वसूल करते. त्यासाठी आरटीओने आकर्षक नंबर कोणते, त्याची यादी निश्चित केलेली आहे. सध्याच्या पद्धतीनुसार, वाहन नोंदणीची नवीन सिरीज खुली होण्याआधी आरटीओच्या वतीने आवाहन करून नागरिकांना चॉईसनंबरसाठी बुकिंग करण्यास सांगण्यात येते. त्यानुसार नागरिक स्वत: आरटीओत जाऊन नंबर बुक करतात. त्यासाठी निश्चित रकमेचा डिमांड ड्राफ्ट किंवा नगदी रक्कम आरटीओत जमा करावी लागते. बुकिंग करून रक्कम भरल्यानंतर सदर क्रमांकाच्या वाहनाची ३० दिवसाच्या आत नोंदणी करणे अनिवार्य आहे. दरम्यान, एका नंबरसाठी एकापेक्षा अधिक अर्ज आले असल्यास संबंधित नंबरची रक्कम डिमांड ड्राप्ट द्वारे जमा करावी लागते.
त्यानंतर लिलाव करून जास्त रक्कम देणाऱ्याला नंबर दिल्या जातो. चॉईसनंबर मिळविण्यासाठी ही सर्व प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाने दिली आहे.
शासनाने सर्वसामान्यांना त्यांच्या आवडीचे नंबर मिळावे, यासाठी आकर्षक चॉईसनंबरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रत्येक नंबरचे शुल्क वेगवेगळे आहे. वाहनधारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.
-जयश्री दुतोडे,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बुलडाणा.