५५ लाखांच्या निधीची चौकशी
By Admin | Published: May 25, 2017 12:59 AM2017-05-25T00:59:54+5:302017-05-25T00:59:54+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश : नगरपालिकेत रंगले राजकारण
विवेक चांदूरकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शहरातील नादुरुस्त रस्त्यांची दुरुस्ती करण्याकरिता आलेला ५५ लाखांचा निधी एकाच वार्डात वळविण्यात आल्याच्या मुद्यावरून सध्या नगरपालिकेत चांगलेच राजकारण तापत आहे. दुसरीकडे भाजप शहराध्यक्षांच्या तक्रारीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी चौकशीचा आदेश दिला.
बुलडाणा नगरपालिकेला सर्वसाधारण रस्ता अनुदानातून संपूर्ण शहरातील नादुरुस्त रस्त्यांची दुरुस्ती करणे, तसेच नवीन रस्ते घेण्याकरिता ५५ लाख रुपयांचा निधी आला. सदर निधी हा रस्ता दुरुस्ती व डागडुजीसाठी असून, वर्षातून एक किंवा दोन वेळा येतो. बुलडाणा नगरपालिकेने मात्र सदर संपूर्ण निधी हा प्रभाग क्रमांक दोनसाठी वापरला आहे. त्यामुळे अन्य नगरसेवकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. सदर निधीचा विनियोग शहरातील सर्वच वार्डासाठी करणे अपेक्षित असते. अनेकदा सत्ताधारी त्यांच्या नगरसेवकांच्या वार्डासाठी या निधीचा वापर करतात. मात्र, बुलडाण्यात केवळ एका प्रभागाकरिताच हा निधी वापरण्यात आला आहे. संपूर्ण शहरासाठी असलेला निधी एकाच वार्डासाठी का देण्यात आला? असा प्रश्न उपस्थित करीत भाजपच्या शहराध्यक्ष विजया राठी यांनी या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेत नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना चौकशीचा आदेश दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी होणार आहे. चौकशीनंतर सदर निधी एकाच प्रभागात जातो की संपूर्ण शहराला मिळतो, याकडे लक्ष लागून आहे.
निधीच्या पळवापळवीवरून राजकारण
५५ लाखांचा निधी वळविण्याच्या मुद्यावरून नगरपालिकेत मोठे राजकारण पेटले आहे. भाजपच्या शहराध्यक्षांनी तक्रार केली आहे. तर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आम्ही नगरध्यक्षांच्या सोबत असल्याचे म्हटले आहे. नगराध्यक्षांनी घेतलेला निर्णय योग्य असून, शहराच्या विकासात खीळ आणण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला आहे.
चार महिन्यांपासून सभाच नाही!
नगरपालिकेत दर दोन महिन्यांनी सर्वसाधारण सभा घ्यायला हवी. यामध्ये विविध मुद्यांवर चर्चा होऊन विकास कामे मार्गी लागतात. मात्र, गत चार महिन्यांपासून बुलडाणा नगरपालिकेत सर्वसाधारण सभा झालीच नाही.
५५ लाखांच्या निधीबाबतचा मुद्दा सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे. नगरपालिकेत दोन महिन्यांनी सभा घ्यायला हवी. मात्र, अजून घेण्यात आली नाही. याबाबत नगराध्यक्षांना पत्राद्वारे कळविले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे सांगितले आहे. त्यानुसार चौकशी करण्यात येणार आहे.
- करणकुमार चव्हाण
मुख्याधिकारी, नगर परिषद बुलडाणा
बुलडाणा शहरात १३ कोटींची विकास कामे सुरू आहेत. मात्र, ५५ लाखांच्या कामांचे राजकारण करण्यात येत आहे. विरोधकांचा हा केवळ राजकीय स्टंट आहे. यात काहीही तथ्य नाही. बुलडाणा शहरात सर्वत्र समान कामे होणार आहेत. सर्वांचा विकास करण्यात येईल. कुठेही दुजाभाव केला जाणार नाही.
- नमुन्नीसा मो. सज्जाद
नगराध्यक्ष, बुलडाणा
संपूर्ण शहरासाठी असलेला निधी एकाच प्रभागात नेणे चुकीचे आहे. या निधीचा वापर संपूर्ण शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी व्हायला हवा. या विरोधात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. सदर निधी संपूर्ण शहरालाच मिळायला हवा. तसेच जुन्या नगराध्यक्षांच्या कार्यकाळात नगरपालिकेने १३ कोटींची विकास कामे मंजूर केली होती. त्याचेही श्रेय विद्यमान नगराध्यक्ष लाटत आहेत.
- विजया राठी, शहराध्यक्ष, भाजप