हिंदू समाजाला सबळ करण्यासाठी संघाचे कार्य अविरत : मोहन भागवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 04:03 PM2018-05-03T16:03:58+5:302018-05-03T17:17:36+5:30
मलकापूर : सर्व विश्वाला सर्वसुखी करणारा हिंदू समाज असून या समाजाला सबळ कसे करायचं, या समाजातील माणसामागे शक्ती कशी उभी करायची असं कार्य संघ करीत असून हे संघाच कार्य अनेकांची तपश्चर्या व तपस्येतून उभ राहिलं आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उद्बोधनातून केले.
मलकापूर : सर्व विश्वाला सर्वसुखी करणारा हिंदू समाज असून, या समाजाला सबळ कसे करायचं, या समाजातील माणसामागे शक्ती कशी उभी करायची हे कार्य संघ करीत असून, संघाच कार्य अनेकांची तपश्चर्या व तपस्येतून उभ राहिलं आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उद्बोधनातून केले.
भारतीय नागरिक उत्थान समिती मलकापूर द्वारा निर्मित पू. बाळासाहेब देवरस स्मृती भवनाचे लोकार्पण ३ मे रोजी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते संपन्न झाले. या वास्तूत उद्यावत अभ्यासिका व संगणक उपलब्धी आहे. या नूतन वास्तूच्या लोकार्पण निमित्त त्यांच्या जाहीर उद्बोधनचा कार्यक्रम लि.भो. चांडक विद्यालयाच्या प.पू. डॉ.हेडगेवार सभागृहा समोरील मैदानावर आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी व्यासपीठावर सरसंघचालक मोहन भागवत यांचेसह संघाचे विभाग संघचालक चित्तरंजन राठी, जिल्हा संघचालक महादेवराव भोजने, भारतीय नागरिक उत्थान समितीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काळे, सचिव अनिल अग्निहोत्री, तालुका संघचालक विनायकराव पाटील, नगर संघचालक दामोदर लखानी आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी मोहन भागवत यांच्याहस्ते दिपप्रज्वलन करण्यात येवून भारत माता पूजन करण्यात आले. तद्वतच व्यासपीठावरील मान्यवरांनी मोहन भगवत यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
उद्बोधन प्रसंगी पुढे बोलताना मोहन भागवत म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे शिस्त अन अनुशासन यांचा मेळ... स्वयंसेवक म्हणजे शुध्द व सात्वीक आत्मीयता... सर संघ कार्यालय म्हणजे आत्मीयता व सूचीतेचा अनुभव देणारं कार्यालय अस अनुभव प्रत्येकाला येतो. तर संघ कार्यालय हे केवळ स्वयंसेवकांचे न राहता ते संपूर्ण समाजाचे व्हावे, समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे, देशभक्तीच्या विचारांचे प्रेरणास्त्रोत व्हावे असे भाव त्यांनी प्रकट केले.
तर स्वयंसेवकांनी स्वताचे वैयक्ति जीवन उन्नत करावे, स्वत:च्या कुटुंबासाठी आवश्यक भौतिक सुविधांसाठी परिश्रम करावेत त्यासाठी लागणारी बुध्दीमत्ता, कौशल्यप्राप्त करावे परंतु त्याचवेळी ज्या समाजामुळे आपण सुखनैव जगतो त्या समाजाचा मात्र विसर पडू देवू नये. समाज सुख, संपन्न, शक्तीशाली व सुस्थिर असेल तरच आपल्याला जीवन आनंदाने जगता येईल, असे प्रेरणादायी विचार त्यांनी मांडले.
मान्यवरांचा परिचय बाळासाहेब काळे यांनी प्रास्ताविकातून विशद केला. नगर संघचालक दामोदर लखानी वास्तू उभारणीच्या गत काळातील इतिहासावर प्रकाशझोत टाकीत विस्तृत माहिती कथन केली. सूत्रसंचालन जयंत राजूरकर यांनी केली तर विजय अबुंसकर यांनी सादर केलेल्या पसायदानाने या कार्यक्रमाचा समारोप झाला. उद्बोधनापूर्वी भूषण शिंदे यांचे वैयक्तीक गीत सादरीकरण करण्यात आले होते.
(प्रतिनिधी)