आरटीइ प्रवेश; शाळांमध्येच द्यावी लागणार कागदपत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 11:58 AM2020-07-06T11:58:53+5:302020-07-06T11:59:27+5:30
आरटीइ पोर्टलवर उपलब्ध असलेले अलॉटमेंट लेटरची प्रतही शाळांमध्ये द्यावी लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : बालकांचा सक्तीचा व शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर वंचित व दुर्बल घटकांतील बालकांना प्रवेश प्रक्रीया सुरू झाली असून त्यासाठी कागदपत्रांची पडताळणी शाळास्तरावरच केली जाणार आहे. सोबतच आरटीइ पोर्टलवर उपलब्ध असलेले अलॉटमेंट लेटरची प्रतही शाळांमध्ये द्यावी लागणार आहे. राखीव जागांवर प्रवेशासाठी तालुक्यातील ३३२ बालकांची निवड झाली आहे, तर ३०२ जणांची प्रतिक्षा यादी शिक्षण विभागाने तयार केली आहे.
प्रवेशाच्या २५ टक्के जागा वंचीत व दुर्बल घटकातील बालकांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. शासनाकडून संपूर्ण राज्यामध्ये दरवर्षी एकदाच आरटीई प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात येते. शैक्षणिक सत्र २०२०-२१ साठी आरटीई प्रक्रियेच्या लॉटरी पद्धतीने प्रवेश निश्चित झाल्यानंतर पालकांना याबाबतचा संदेश त्यांनी रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर पाठविला जात आहे. तथापि, काही तात्रिक अडणीमुळे पालकांना प्रवेशाबाबतचा संदेश न मिळाल्यास पालकांनी संकेतस्थळावर भेट दिल्यास सुद्धा प्रवेशाबाबतची स्थिती पाहता येते.
आधीच्या प्रक्रीयेनुसार पालकांना पंचायत समिती स्तरावर पडताळणी समितीकडे कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर शाळेत प्रवेश दिला देण्याचे ठरले. त्यामध्ये आता बदल करण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झालेल्या शाळेतच कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. त्याबाबतचा संदेश पालकांना मोबाईलवर संदेश दिला जात आहे.
पालकांना मेसेज न मिळाल्यास आरटीइ पोर्टलवर प्रवेशाची तारिख याठिकाणी अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याचा दिनांक पाहता येतो. सोबतच प्रवेशासाठी लागणारे कागदपत्रे आरटीइ पोर्टलवरील अर्जाची स्थिती यावर क्लिक करून हमीपत्र व अलॉटमेंट लेटरची प्रत घ्यावी, ती शाळेत दिल्यानंतर तात्पुरता प्रवेश निश्चित होणार आहे.
संबंधित शाळांनी प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची सर्व कागदपत्रे तालुकास्तरीय पडताळणी समितीकडे सादर करून तपासणी करून घ्यावी लागणार आहे. त्या समितीच्या मंजूरीनंतरच विद्यार्थ्यांचे प्रवेश अंतिम होणार आहेत. दरम्यान, अलॉटमेंट लेटरवर शाळांमध्ये प्रवेश मिळणार आहे.
तालुक्यातील २९ शाळांमध्ये होणार प्रवेश
खामगाव तालुक्यातील २९ शाळांमध्ये ३३२ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. तर ३०२ विद्यार्थ्यांची प्रतिक्षा यादी आहे. निवड यादीतील प्रवेशासाठी अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या जागेवर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.