आरटीई : प्रवेश घेण्याच्या कालावधीत अर्ज भरण्याची वेळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 06:18 PM2019-03-04T18:18:26+5:302019-03-04T18:18:39+5:30
बुलडाणा: आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील शााळांचा निरूत्साह दिसून येत आहे. शाळांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून यामध्ये जिल्ह्यातील केवळ २१४ शाळांनी नोंदणी केली आहे.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील शााळांचा निरूत्साह दिसून येत आहे. शाळांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून यामध्ये जिल्ह्यातील केवळ २१४ शाळांनी नोंदणी केली आहे. ५ मार्चपासून पालकांसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत असून ही प्रवेश प्रक्रिया लांबल्याने प्रवेश घेण्याच्या कालावधीत अर्ज भरण्याची वेळ पालकांवर आली आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिक दुर्बल घटकातील बालकांसाठी इयत्ता पहिलीमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. आरटीईची ही प्रवेश प्रक्रिया नवीन सत्रातील शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी जानेवारी अखेरपर्यंत शाळा नोंदणी व फेब्रुवारीच्या दुसºया आठवड्यामध्ये पालकांना अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविणे महत्त्वाचे असते; परंतू २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया एक महिना उशीराने सुरू असल्याचे दिसून येते. आतापर्यंत तिसरी लॉटरी होऊन शाळेत मुलांचे प्रवेश घेणे अपेक्षीत असताना सध्या जिल्ह्यात केवळ शाळा नोंदणीचीच प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ८ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत शाळा नोंदणी व त्याची तपासणी करण्यात आली. त्यानंतर ५ मार्चपासून पालकांना आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. २२ मार्च पर्यंत प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. साधारणत: एप्रिल मध्ये पहिली लॉटरी पद्धत सुरू होण्याचे चिन्ह दिसून येत आहेत. यामुळे आरटीईची प्रवेश प्रक्रिया लांबणीवरच जात असल्याने शाळा सुरू होण्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होणे अवघड आहे.
घाटाखाली केवळ ८१ शाळा
शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या शाळांनी आरटीई प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यास उत्सुकता दर्शविली नाही. त्यामुळे जिल्हाभरातू केवळ २१४ शाळांचीच आतापर्यंत नोंद झाल्याचे स्पष्ट होते. त्यामध्ये घाटाखालील भागातून तर अवघ्या ८१ शाळांचाच सहभाग दिसून येतो.
देऊळगाव राजा तालुका उदासीन
आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी शाळांमध्ये कमालीची उदासीनता पाहावयास मिळत आहे. जिल्ह्यात सर्वात कमी शाळांची नोंद देऊळगाव राजा तालुक्यातून झाली आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील फक्त नऊ शाळांनी या प्रक्रियेमध्ये समावेश घेतला आहे. तर सवाधिक शाळा ह्या खामगाव तालुक्यातून आहेत. खामगाव तालुक्यातून ३५ शाळांनी नोंद केली आहे.
आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेत शाळा नोंदणी पूर्ण झाली आहे. ५ मार्चपासून पालकांसाठी आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. मध्यंतरी आॅनलाइन प्रणालीमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या.
- डॉ. श्रीराम पानझाडे,
माध्यमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.